देशात गाळप धिम्या गतीने | पुढारी

देशात गाळप धिम्या गतीने

संतोष बामणे

जयसिंगपूर : देशभरात 433 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झालेला असून ऊस गाळप 511.02 लाख टन झाले आहे. त्यातून 43.20 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात 451 कारखाने सुरू झाले होते, तर 570 लाख टन गाळपातून 48.35 लाख टन साखर उत्पादित झाली होती. यामुळे यंदा ऊस गाळप संथ गतीने सुरू आहे. अशातच राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने पुन्हा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे.

यंदा साखर उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत 5.15 लाख टनांनी कमी आहे, तसेच सरासरी साखर उतारा 0.2 टक्क्यांनी कमी आहे. देशातील नव्या गाळप हंगामाची सुरुवात थोडी लवकर झालेली असली तरी प्रत्यक्ष ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गतवर्षीच्या तुलनेत संथ असल्याचे दिसून येते. यंदा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. तर कर्नाटक राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला झाले आहेत.

त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील ऊसदर आंदोलनामुळे कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास विलंब झाला आहे. याशिवाय, एल निनो चक्रीवादळाच्या प्रभावामुळे यंदा ऊस गाळप व साखर उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी साखरेचे निव्वळ उत्पादन 339 लाख टन झाले होते. त्याव्यतिरिक्त इथेनॉल सरासरी साखर उतार्‍यामध्ये मात्र, उत्तर प्रदेशने 9.05 टक्के उतारा घेऊन आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकचा सरासरी साखर उतारा 8.50 टक्के राहिला असून महाराष्ट्राला मात्र सरासरी साखर उतारा 7.85 टक्के इतकाच मिळाला आहे.

थंडी सुरू झाल्यानंतर साखर उतार्‍यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. निर्मितीसाठी 43 लाख टन साखरेचा वापर झाला होता. मात्र, यंदा 40 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवल्यानंतर साखरेचे उत्पादन 291.50 लाख टन इतकेच होण्याचा अंदाज आहे. सारखेच्या उत्पन्नात घट झाल्यास त्याचा परिणाम त्याच्या दरावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचे चित्र गळीत हंगामाच्या अखेरीस स्पष्ट होईल.

इथेनॉलच्या दराची प्रतीक्षा

केंद्र सरकारने इथेनॉलचे वर्ष 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर करण्याचा निर्णय घेऊनसुद्धा नोव्हेंबर सरला तरी इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ झाल्याची अधिसूचना अद्यापही काढलेली नाही. त्यामुळे इथेनॉल निर्मिती करणार्‍या कारखान्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित मंत्रालयाशी पाठपुरावा केल्यानंतर इथेनॉलचे नवीन दर जाहीर होण्यात जरी विलंब झाला असला तरी नवे दर 1 नोव्हेंबरनंतर पुरवठा केलेल्या इथेनॉलला लागू होतील, असे साखर तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Back to top button