कोल्हापुरात बनावट नोटाप्रकरणी एनआयएचा छापा; दोघे ताब्यात | पुढारी

कोल्हापुरात बनावट नोटाप्रकरणी एनआयएचा छापा; दोघे ताब्यात

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी शुक्रवारी एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) देशभरात छापे टाकले. कोल्हापूर जिल्ह्यातही एका पथकाने छापा टाकून राहुल तानाजी पाटील व जावेद देसाई या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

बनावट नोटांबाबत एनआयएकडे 24 नोव्हेंबरला तक्रार आली होती. या तक्रारीत बनावट नोटांची निर्मिती होत असून त्याचा बाजारपेठेत पुरवठाही होत असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनुसार एनआयएच्या पथकांनी शुक्रवारी (1 डिसेंबर) महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकात छापेमारी केली. यामध्ये बनावट नोटा, प्रिंटर व कागद असे साहित्य जप्त केले.

एनआयच्या एका पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातही कारवाई केली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने शहरालगत महामार्गावरील दोन गावांतून पाटील आणि देसाई या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी पाच ते सहा बनावट सिमकार्डचा वापर करून या नोटा खपवल्या व त्याचे ऑनलाईन पेमेंट घेतल्याचा संशय एनआयएला आहे.

Back to top button