महामार्गावर धरण? कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध

Kolhapur flood
Kolhapur flood

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गाची उंची भराव टाकून वाढवण्यात येणार आहे. यामुळे दरवर्षी कोल्हापुरातील निर्माण होणारी पूरस्थिती आणखी गंभीर होण्याचा धोका आहे. भराव टाकून उंची वाढवण्याच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्णयाला कोल्हापूरकरांनी तीव— विरोध केला आहे. याबाबत संताप व्यक्त होत असून भराव टाकून महामार्गाची उंची वाढवू नका, प्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशारा देण्यात आला आहे.

महापुरात महामार्गाचा शहराशी संपर्क तुटू नये, याकरिता शिरोली ते पंचगंगा पूल या परिसरात भराव टाकून उंची वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी बॉक्सेस बांधण्यात येणार असले तरी याकरिता टाकलेला भराव धरणासारखेच काम करणार आहे. यामुळे 'महामार्गावर धरण आणि आमच्या दारात मरण' असा हा प्रकार आहे. मात्र आम्ही तो होऊ देणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

'महामार्गावर धरण? कोल्हापूरकरांचे मरण' असे वृत्त दै. 'पुढारी'त गुरुवारी प्रसिद्ध होताच नागरिकांतून तीव— प्रतिक्रीया उमटू लागल्या. मुळातच निम्मे शहर पाण्याखाली जाते. त्याला महामार्गाची सध्याची परिस्थिती कारणीभूत आहे. आता महामार्गाची उंची आणखी वाढली तर ती परिस्थिती आणखी गंभीर व्हावी, नागरिकांचे मोठे नुकसान व्हावे, अशी प्रशासनाची इच्छा आहे का, असा खडा सवालही उपस्थित केला जात आहे.

कराडमध्ये दीड-दोन किलोमीटर उड्डाणपूल; कोल्हापुरात का नाही?

महापुरातही महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी याकरिता महामार्गावरील पुराच्या सर्वोत्तम पातळीच्या चार फूट उंच महामार्ग होणार आहे. यामुळे शिरोली ते पंचगंगा पूल या ठिकाणी शहराच्या बाजूला धरणासारखीच परिस्थिती निर्माण होणार आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी बॉक्सेस बांधण्यात येणार आहेत. मात्र, त्याऐवजी उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. कराड येथे दीड-दोन किलोमीटर लांबीचा पूल उभारला जात आहे. मग कोल्हापुरात एक कि.मी.चा पूल का होत नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.

लोकांनी बांधकाम करताना भराव टाकायचा नाही, हायवे मात्र डॅमसारखा बांधायचा का? इंडियन रोड काँग्रेसचे काही नियम आहेत. त्यातील अनेक नियमांची पायमल्ली होत आहे. पाणी वाहून जाण्यासाठी जे बॉक्स उभारले जाणार आहेत, त्या बॉक्समधून किती पाणी जाणार आहे? त्यामुळे सध्याची महापुराची पातळी आहे, ती आणखी कमी होईल का, याबाबत महामार्ग प्राधिकरण काहीही सांगत नाही. भराव टाकू नये अन्यथा प्रसंगी याविरोधात न्यायालयीन लढाई, जनरेटा उभा करावा लागेल
– अजय कोराणे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्चर अँड इंजिनिअरिंग

शहरातील व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी, महावीर महाविद्यालयासह नागाळा पार्कमधील बहुतांश परिसरात पाणी घुसते. आपल्या प्रभागातील 75 टक्क्यांहून अधिक भाग पुरातच असतो. महामार्गाची भराव टाकून उंची वाढवली तर पाणी पातळी आणखी वाढेल आणि परिणामी नागरिकांचे मोठे नुकसान होईल. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांच्याशी चर्चा केली आहे. भराव टाकून उंची वाढवण्याचा निर्णय मागे घ्यायला हवा.
– राहुल चव्हाण, माजी नगरसेवक

ग्रामपंचायत शिरोलीत महिनाभरापूर्वी एक बैठक घेतली होती. यापूर्वीच्या पुरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यायला पाहिजे. अन्यथा महामार्ग पुन्हा धरणासारखी परिस्थिती निर्माण होणार असेल तर कोल्हापूरकरांसह महामार्गाच्या आजूबाजूच्या गावांनाही त्याचा फटका बसणार आहे. यामुळे याबाबत तातडीने निर्णय झाला पाहिजे. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.
– गिरीश फोंडे, स्टुडंट फेडरेशन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news