कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्ग महापुरात पाण्याखाली जाऊ नये, यासाठी शिरोली ते पंचगंगा पूलदरम्यान भराव टाकून उंची वाढवण्यात येणार आहे. सुमारे तीन मीटरपर्यंत उंची वाढणार असल्याने महामार्गावर एकप्रकारचे धरणच तयार होणार असून, ते महापुरात कोल्हापूरवासीयांचे मरण ठरणार आहे. या भरावाने शहरात आणखी पाणी घुसून पूर पातळी वाढण्याचा गंभीर धोका आहे. याबाबत वेळीच निर्णय घेतला नाही, तर दरवर्षी निम्मे कोल्हापूर शहर पाण्याखाली जाणार, हे निश्चित आहे.
जिल्ह्याला 2019 आणि 2021 साली महापुराचा जोरदार तडाखा बसला. 2019 मधील पुराची सर्वोच्च पातळी 2021 साली ओलांडली. कोल्हापूर शहराला मोठा फटका बसला. शहराचा प्रमुख भाग पाण्याखाली गेला. यामुळे कित्येक कोटींचे नुकसान झाले. दर दोन-तीन वर्षांनी महापुराच्या गंभीर होत जाणार्या परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण जरा जरी वाढले, तरी कोल्हापूरवासीयांच्या उरात धडकी भरते.
जिल्ह्यात 2005 साली पुणे-बंगळूर महामार्ग पाण्याखाली गेला होता. यानंतर 2019 व 2021 साली महामार्गावरील पाण्याची पातळी अधिक होती. अनेक दिवस महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहिला. त्याचा मोठा परिणाम व्यापार आणि दळणवळणावर झाला. पूरस्थितीतही महामार्ग खुला राहिला पाहिजे, त्यावरील वाहतूक बंद होऊ नये, यासाठी सातारा-कागल महामार्ग रुंदीकरणाच्या कामात शिरोली ते पंचगंगा पूल यादरम्यान महामार्गाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
महामार्गावर तयार होणार एकप्रकारचे धरणच
महामार्गाची उंची वाढवताना, केवळ महामार्गावर पाणी येणार नाही, याचाच विचार केला आहे. त्यामुळे थेट भराव टाकून उंची वाढविण्यात येणार आहे. आतापर्यंत महामार्गावर आलेल्या महापुराच्या पाण्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा चार फूट उंच हा मार्ग केला जाणार आहे. यामुळे शिरोली ते पंचगंगा पूल यादरम्यान सध्या असलेल्या पातळीवरही सुमारे तीन मीटर उंचीचा भराव तयार होणार आहे. यामुळे एकप्रकारे या परिसरात धरणच तयार होणार आहे. सध्या या परिसरात असलेल्या भरावाने पाणी पुढे सरकत नाही, त्यात आता आणखी भरावाची उंची वाढणार असल्याने शहरातील पूर पातळीतही वाढ होणार असून, आणखी भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.
भरावाखाली पाणी वाहून जाण्यासाठी 12 बॉक्सेस
सध्याच्या आराखड्यानुसार, या भरावाच्या ठिकाणी दोन्ही बाजूने एकूण 12 बॉक्सेस तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येकी सहा मीटर लांब असणार्या या बॉक्सेसमुळे पुराचे पाणी साचणार नाही, ते पुढे वाहून जाईल, असा महामार्ग प्रशासनाचा दावा आहे. मात्र, प्रत्येक दोन बॉक्सेसमधील अंतर, त्या ठिकाणची उंची यांचा विचार करता, एकाचवेळी सर्व बॉक्सेसमधून पाणी वाहून जाईल, अशी परिस्थिती नाही. जसजशी पाण्याची पातळी वाढत जाईल, तसतसे प्रत्येक पुढील बॉक्समधून पाणी वाहून पुढे जाणार आहे. यामुळे शहरात घुसलेले पाणी कमी होण्यास उशीर लागणार आहे.
खर्च कमी करण्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळ
भराव टाकून रस्ता उंच करणे, हा अन्य सर्व पर्यायांपैकी सर्वात कमी खर्चाचा पर्याय आहे. यामुळे महामार्गाची उंची वाढविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने या पर्यायाचा विचार केला आहे. महामार्गाच्या कामाचा खर्च कमी करण्यासाठी हा पर्याय स्वीकारला असला, तर त्यामुळे कोल्हापूर शहरातील जनतेच्या जीवाशीच एकप्रकारे खेळ खेळला जात असल्याच्या सार्वत्रिक भावना निर्माण झाल्या आहेत.
पिलर टाकून उड्डाणपुलाची गरज
पुणे-बंगळूर महामार्गावर कराड शहरातील जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवा पूल उभारण्यात येत आहे. हा पूल लांब असून, या पुलाला कोठेही भराव टाकलेला नाही. केवळ आणि केवळ अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिलर टाकण्यात आले आहेत. याच धर्तीवर शिरोली ते पंचगंगा पूल या मार्गापर्यंत जितकी उंची वाढवली, ती भराव टाकण्याऐवजी, पिलर टाकून वाढवण्याची गरज आहे. त्याकरिता आणखी काही कोटी रुपयांचा खर्च आला तरी चालेल; पण भविष्यात शहराची न भरून येणारी हानी टाळता येणार आहे. दरवर्षी महापुराने होणारे शहराचे कोट्यवधींचे नुकसान टाळण्यासाठी सध्याच्या प्रस्तावात बदल करून आवश्यक उंचीचे पिलर टाकूनच या महामार्गाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे.
तिन्ही खासदार करतात तरी काय?
महामार्गाची उंची वाढल्याने महापुरात महामार्ग सुरू राहील, हे जरी खरे असले; तरी भरावामुळे पाणी साचण्याचे प्रमाण वाढून, महापुराची कोल्हापूर शहरातील पाणी पातळी वाढण्याचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असताना, याकडे जिल्ह्यातील तिन्ही खासदारांचे लक्षच नाही का? हा आराखडा तयार होताना, एकानेही त्याला विरोध केला नाही का? हे तिन्ही खासदार नेमके करतात तरी काय? असे सवाल आता कोल्हापूरकर उपस्थित करू लागले आहेत.