Gold prices : सोने दराचा नवा उच्चांक; चांदीलाही अभूतपूर्व झळाळी | पुढारी

Gold prices : सोने दराचा नवा उच्चांक; चांदीलाही अभूतपूर्व झळाळी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सलग चौथ्या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली असून, 11 मे नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर बुधवारी (दि.29) जीएसटीसह 64 हजार 700 रुपयांवर गेला, त्यानंतर त्यात थोडी घट झाली. चांदीचा दरही जीएसटीसह 77 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे.

इस्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बाजारात चलनवाढीचे संकेत मिळत असल्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. परिणामी, दरात सतत वाढ होत असून 5 ऑक्टोबरनंतर सोन्याच्या दरात जवळपास 6 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही 7 हजार 500 रुपयांहून अधिक प्रतिकिलो वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात 18 टक्क्यांहून अधिक, तर आंतरराष्ट्रीय बाजारात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात डॉलरच्या दरात झालेल्या वाढीमुळे रुपयांमध्ये सोने दराचा नवा उच्चांक झाला. 11 मे रोजी राष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 63 हजार 410 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मंगळवारी तो 64 हजार 360 रुपये झाला.

रुपयांतील दराचा विचार करता सोने दराचा भारतात उच्चांक झाला आहे. मात्र, डॉलरमध्ये तो अजून उच्चांकी झालेला नाही. कारण मधल्या काळात रुपयाच्या तुलनेत डॉलरचा दर वाढल्यामुळे डॉलरमध्ये दर उच्चांकी पातळीवर जाण्यापूर्वीच रुपयामध्ये दर उच्चांकी झाला आहे, असे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले.

Back to top button