कोल्हापूर : रस्त्यासाठी मिळणार आणखी 90 कोटी | पुढारी

कोल्हापूर : रस्त्यासाठी मिळणार आणखी 90 कोटी

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करून डांबरीकरणासाठी राज्य शासनाला 90 कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावात वाहतुकीची वर्दळ असलेल्या 82 रस्त्यांचा समावेश आहे. सुमारे 200 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव आहे. पुढील आठवड्यात प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर लवकरच हा निधी महापालिकेकडे वर्ग होणार आहे.

कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय बनले आहेत. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अपघातामुळे काहीजणांचा बळी गेला आहे. हाडे खिळखिळी होत आहेत. मनपाची आर्थिक स्थिती नसल्याने पॅचवर्कवरच काम सुरू आहे. यामुळे नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी नागरिक आंदोलन करत आहेत. महापालिकेने शहरातील रस्त्यांसाठी प्रस्ताव करून निधीसाठी शासनाला सादर केला आहे.

100 कोटींच्या रस्त्यांचा मुहूर्त कधी?

शहरातील रस्त्यासाठी यापूर्वी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. मनपाकडे निधी वर्ग झाला आहे; मात्र चार महिने झाले डांबरीकरणाला मुहूर्त लागलेला नाही. शिंदे गट आणि ठाकरे गटातील राजकारणाचा फटका बसल्याने काहीकाळ काम रेंगाळले. परंतु, आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील आठवड्यात ठेकेदार कंपनीला वर्कऑर्डर देण्यात येणार आहे. यात शहरातील प्रमुख 16 रस्ते, गटर चॅनेल, फुटपाथ आदींचा समावेश आहे.

Back to top button