कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : महामार्गावरून जाणारी वाहने कोल्हापूर शहरातून कसबा बावडामार्गे वळवण्यात आली. यामुळे कसबा बावडा मुख्य मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी होऊन दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गुरुवारी सकाळी दहा वाजल्यानंतर हायवेवरील वाहतूक ताराराणी चौक धैर्यप्रसाद चौक जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालय येथून कसबा बावडामार्गे वळविण्यात आली. दुसरीकडे शिये येथून हायवेवरील वाहतूक कसबा बावडामार्गे वळविण्यात आली. दोन्ही बाजूने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात कसबा बावडा मुख्य मार्गावरून सुरू झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. शहर वाहतूक कार्यालयाचे पोलिस वाहतुकीचे नियोजन करत होते.
सांगली मार्गावर प्रवाशांचे हाल
जयसिंगपूर : पुणे-बंगळूर महामार्ग रोखल्याने सांगली मिरजेकडे येणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सांगली-कोल्हापूर व मिरज-कोल्हापूर मार्गावरील 150 हून अधिक एस.टी.च्या फेर्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मिरज-कोल्हापूर मार्गावर रेल्वेला प्रशांवाची प्रचंड गर्दी झाली होती. मराठवाड्यात व पंढरपूर यात्रेतून जादा येणार्या अनेक एस.टी. बसेस जयसिंगपूर बसस्थानकांत थांबविण्यात आल्या होत्या.
पंढरपूर येथे यात्रेसाठी जिल्ह्यातील 12 आगारांतून अनेक जादा फेर्या सोडल्या. त्या बसेस व नियमित सोलापूर, तुळजापूर, बीड, नांदेड, गाणगापूर यासह विविध बसेस जयसिंगपूर बसस्थानकांत थांबविण्यात आल्या. बसस्थानके प्रवाशांनी फुल्ल भरली होती.
'स्वाभिमानी' व 'अंकुश'चे कार्यकर्ते ताब्यात
जयसिंगपूर : आंदोलनाच्या पूर्वीच पहाटे स्वाभिमानीचे पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे, स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेट्टे, आंदोलन अंकुशचे भूषण गंगावणे यांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले. स्वाभिमानीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने बुधवारी रात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती.
हातकणंगले बसस्थानक बनले वाहनतळ
हातकणंगले : मिरज-सांगलीकडून महामार्गाकडे जाणारी वाहने हातकणंगले येथे थांबविण्यात आली. त्यामुळे हातकणंगले बसस्थानकाची अवस्था वाहनांचा तळ, अशी झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अडकून पडलेल्या प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. बससेवा विस्कळीत झाल्याने तहसील व पंचायत समिती कार्यालयामध्ये शुकशुकाट जाणवत होता. पोलिसांनी इचलकरंजी व इतर मार्गांवरून येणार्या वाहनांना वडगाववरून मार्ग काढून दिला. कर्मचारी वर्ग वेळेवर कार्यालयात पोहोचू शकले नाहीत.
लक्ष्मीटेकडीजवळ वाहतूक वळवली
उजळाईवाडी : चक्काजाम आंदोलनामुळे प्रशासनाने महामार्गावरून जाणारी सर्व वाहतूक सकाळी अकरा वाजल्यापासून लक्ष्मी टेकडीजवळ थांबून पट्टणकडोली, हुपरीमार्गे कोल्हापूरच्या बाहेरून वळवण्यात आली. सकाळी महामार्गावरून येणारी वाहने उजळाईवाडी उड्डाणपुलापासून पुढे महामार्गावरून न जाता शाहू नाक्यापासून शहरातून शिये फाट्याकडे वळविण्यात आली होती. कागलमार्गे येणारी सर्व वाहतूक लक्ष्मी टेकडीजवळ वळवल्याने गोकुळ शिरगाव एमआयडीसी व आजूबाजूच्या गावांतील वाहने फक्त शहरात येत होती.
शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
कोल्हापूर : रघुनाथ पाटीलप्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी मार्केट यार्डातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर ऊस उत्पादन खर्चाचा पारायण सोहळा, असे अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल 3500 व सरकारकडून 1500 अशी एकूण पाच हजार रुपये द्यावेत. तसेच मागील उचल कारखान्याकडून 400 व सरकारकडून 600 अशी एकूण 1000 द्यावे, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, महादेव कोरे, नंदकुमार पाटील, शंकर मोहिते, उत्तम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
करवीर तालुकाध्यक्षासह दोघे ताब्यात
गांधीनगर : ऊस दर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करवीर तालुकाध्यक्ष संजय बापूसाहेब चौगुले व वळीवडे शाखाध्यक्ष राजेंद्र पांडुरंग रेपे यांना गांधीनगर पोलिसांनी वळीवडे (ता. करवीर) येथे त्यांच्या निवासस्थानीच ताब्यात घेतले. संजय चौगुले व राजेंद्र रेपे शेकडो कार्यकर्त्यांसह पुणे-बंगळूर महामार्गावर चक्काजाम आंदोलनासाठी शिरोलीकडे जाण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
इचलकरंजीसह परिसरातील कार्यकर्त्यांची धरपकड
इचलकरंजी शहर तसेच कबनूर, चंदूर व शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांची शिवाजीनगर पोलिसांनी धरपकड केली. यामध्ये 29 जणांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले. त्यामध्ये कबनूर येथील मिलिंद कोले, महावीर लिगाडे, विद्यासागर चराटी यांना घरातून ताब्यात घेतले. तर चंदूर येथील राजू पाटील तसेच अन्य तिघे, रांगोळी येथील एक जण अशांना ताब्यात घेण्यात आले. तर सकाळी शिरोळ तालुक्यातून आंदोलनाकडे जाणार्या 21 कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.