Dudhganga Vedganga Sakhar Karkhana | ‘बिद्री’ : नव्या जोडण्या, नवी गणिते, कारखान्याचा निकाल ठरविणार राजकारणाची दिशा

Dudhganga Vedganga Sakhar Karkhana | ‘बिद्री’ : नव्या जोडण्या, नवी गणिते, कारखान्याचा निकाल ठरविणार राजकारणाची दिशा
Published on
Updated on

कोल्हापूर : दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना 'बिद्री'च्या निवडणुकीत आरोपांचा धुरळा उडला आहे. गेल्यावेळचे विरोधक सत्ताधारी गटात, तर गेल्यावेळचे सत्ताधारी विरोधी गटात गेल्याने तेथे नव्या राजकीय जोडण्या आकाराला येणार आहेत. या जोडण्यांतूनच नवी राजकीय गणिते आकाराला येण्याची चिन्हे आहेत. (Dudhganga Vedganga Sakhar Karkhana)

'बिद्री'चे राजकारण नेहमीच रंगतदार राहिले आहे. तेथे कोण कधी कोणाच्या विरोधात जाईल, हे सांगता येत नाही. ज्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्यांनी तो हात झटकला, असे अनेकवेळा 'बिद्री'त घडले आहे. आताही तसेच घडत आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सलग दहा वर्षे अध्यक्षपद भूषविल्यानंतर त्या पदावर राहता येत नव्हते. त्यातूनच माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी कारखान्याचे अध्यक्षपद के. पी. पाटील यांच्याकडे एक वर्षासाठी सोपविले. तेथून के. पी. पाटील यांनी आजअखेर मागे पाहिले नाही. कारखान्याची सत्तासूत्रे कायम हाती राखताना उच्चांकी ऊस दर हाच त्यांच्या प्रचाराचा मुद्दा राहिला आहे. आताही याच मुद्द्यावर ते भर देत आहेत. मात्र, या मधल्या काळात खूप काही राजकीय घडामोडी घडल्या.

'बिद्री'च्या राजकारणात कागलचा राजकीय संघर्ष संपला

2005 साली कारखान्याच्या निवडणुकीत कागलचे वैर विसरून 'बिद्री'च्या राजकारणात सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे हे परस्परांचे कट्टर राजकीय वैरी एकत्र आले आणि त्यांनी परिवर्तन घडविले. के. पी. पाटील यांच्याकडे सत्ता सोपविताना दिनकरराव जाधव यांची सत्ता संपुष्टात आणली. कागलच्या राजकारणातील संघर्षाचा मोठा अध्याय 'बिद्री'च्या राजकारणात संपुष्टात आला.

समझोत्याची केवळ चर्चाच

के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेहुण्या पाहुण्यांची जोडी 'बिद्री'च्या राजकारणात प्रसिद्ध. के. पी. पाटील दोनवेळा आमदार झाले. कारखान्याची सत्ता त्यांच्याकडे. त्यामुळे कुठली तरी एक सत्ता आपल्याकडे असावी, असा विचार ए. वाय. पाटील यांच्या मनात आला आणि त्यांनी दोनवेळा तशी आग्रही भूमिका घेतली. मात्र, पडद्याआड नेत्यांच्या बैठकीत काय ठरले हे त्या दोघांनाच माहिती. के. पी. पाटील यांनी कारखान्याची धुरा ए. वाय. पाटील यांच्याकडे सोपवावी, असा समझोता सूचविण्यात आल्याची चर्चा जोरात होती.

ए. वाय. पाटील यांची वेगळी वाट

ठरलेले काहीच घडत नाही म्हटल्यावर गेली काही वर्षे सलग आपल्या नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली. प्रत्यक्षात आपल्या हाती काहीच लागत नाही म्हटल्यावर सगळे निर्बंध झुगारून देत ए. वाय. पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. कारखान्याची सत्ता किंवा आमदारकी यापैकी एक हे आता नाही तर कधीच नाही या ईर्ष्येने ए. वाय. पाटील यांनी भूमिका घेतली आहे.

'बिद्री'चे बदलते राजकारण

'बिद्री'च्या राजकारणात सत्तेतील स्वकीयांना विरोधात ढकलले आहे, तर विरोध करणार्‍यांचे सूर सत्तारूढ आघाडीबरोबर जुळले आहेत. दिनकरराव जाधव आणि के. पी. पाटील यांच्यात कधी सख्य तर कधी वैर हे कायमच आहे. गेल्या निवडणुकीत जाधव पाटील यांच्या विरोधात होते. आता ते दोघेही 'बिद्री'च्या निवडणुकीत बरोबर आहेत. याचबरोबर विजयसिंह मोरे हेही के. पी. पाटील यांच्या विरोधात होते. आता मोरे यांचा गट त्याचबरोबर भाजपचे राहुल देसाई हे स्वतः के. पी. पाटील यांच्याबरोबर आहेत.

संघर्षाला धार

के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. हे त्यांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे 'बिद्री'तील राजकीय संघर्षाला धार आली आहे. सत्ताधारी विरोधात गेल्यानंतर त्यांच्या हाती कारखान्याची सर्व माहिती असल्याने टोकदार आरोप होत आहेत. सत्ताधारी आपल्या दरावर ठाम आहेत. हे सगळे करताना कधी काळी आमदार प्रकाश आबिटकर हे के. पी. पाटील यांच्यासमवेत होते. आपणच त्यांना कारखान्यात सभासद म्हणून घेतल्याचे के. पी. पाटील सांगतात. मात्र, आबिटकर सातत्याने के. पी. पाटील यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत. इथेनॉल प्रकल्पाला आबिटकर यांनी विरोध केला होता. मात्र, त्याचे इरादा पत्र आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आणल्याचे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आबिटकर यांच्यावर पलटवार केला आहे.

मुश्रीफ-सतेज के. पीं. बरोबर

आपण विकास करतो, मात्र आमदार विरोध करतात हे ठसविण्याचा मुश्रीफ यांनी प्रयत्न केला, तर जिल्हा काँग्रसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी के. पी. पाटील यांच्या पाठीमागे आपण ठाम असल्याचे सांगितले. कारभाराचा पंचनामा होत असताना विरोधकांनीही व्यवस्थित मोट बांधली आहे.

कागल आणि बिद्री चर्चेचा विषय

2005 च्या निवडणुकीत आपले राजकीय वैर बाजूला ठेवून सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे 'बिद्री'च्या निवडणुकीत एकत्र आले होते. आता त्यांचे वारसदार संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आले आहेत. कागलचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे हे के. पी. पाटील यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे कागल आणि बिद्रीचे राजकारण हा चर्चेचा विषय ठरला आहे. (Dudhganga Vedganga Sakhar Karkhana)

कारखान्याचा निकाल ठरविणार राजकारणाची दिशा

खासदार संजय मंडलिक व धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे आदींनी ए. वाय. पाटील व आबिटकर यांच्या पॅनेलमध्ये आपली ताकद उभी केली आहे. निवडणूक जवळ येईल तशी आरोपांना धार येणार आहे. सभासद आता कोणाच्या हाती कारखान्याची सूत्रे सोपवितात त्यावर 'बिद्री'च्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news