कोल्हापूर : ऊस दरावर अखेर तोडगा | पुढारी

कोल्हापूर : ऊस दरावर अखेर तोडगा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर महामार्ग रोखून धरत जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार, संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची बैठक झाली. त्यात अखेर तोडगा निघाला. बैठकीत गेल्या हंगामात ज्यांनी 3 हजार रुपयांपेक्षा कमी एफआरपी दिला, त्यांनी शंभर रुपये; तर ज्यांनी 3 हजारांवर एफआरपी दिला, त्यांनी 50 रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेली प्रत आंदोलनस्थळी वाचून दाखवली, त्यानंतर महामार्गावरील चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, या निर्णयानुसार साखर कारखान्यांनी प्रस्ताव पाठवावेत, जिल्हाधिकार्‍यांनी ते मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करावेत, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

महामार्गावर आंदोलन सुरू असताना काही कारखानदार शंभर रुपये देण्यासाठी तयार असल्याचा निरोप जिल्हा प्रशासनाने शेट्टी यांना दिला. यानंतर संघटनेचे प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक, ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, दीपक पाटील, दत्तात्रय आवळे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी साखर कारखानदार, संघटनांचे प्रतिनिधी आदींशी चर्चा करून शंभर व पन्नास रुपयांचा तोडगा काढण्यात आला. त्याबाबतचे पत्र तयार करण्यात आले. हे पत्र शेट्टी यांना सायंकाळी सात वाजता देण्यात आले.

आंदोलन चिरडून टाकू, असे म्हणणार्‍यांची एकजूट झाल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, दीड महिन्यात एकही कारखाना चर्चेसाठी पुढे येत नव्हता. अनेकांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची भक्कम एकजूट झाली होती. त्यांची एकजूट फुटत नाही, तोपर्यंत आपल्या हाताला काही लागणार नाही, हे माहीत होते. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांची एकजूट तुटली त्याबद्दल शेतकर्‍यांचे अभिनंदन, करतो.

आंदोलनासाठी शेतकरी येऊ नयेत म्हणून अनेक अडथळे निर्माण करण्यात आले होते. ठिकठिकाणी पोलिस अडवत होते. काही साथीदार अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपली ओळख लपवून, चोर वाटेने यावे लागले. त्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. परंतु, यामुळेच आपण आजची लढाई अखेर जिंकली. याबद्दल शेतकर्‍यांचे अभिनंदन करतो.

मागण्या मान्य झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फुलांचा वर्षाव करत शेट्टी यांचे महिलांनी औक्षण केले. कार्यकर्त्यांनी मोबाईलचा टॉर्च सुरू करून पाठिंबा व्यक्त केला.

दरम्यान, आंदोलनामुळे गैरसोय झाल्यामुळे आपण नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत माझ्या शेतकरी बांधवांनाही समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

Back to top button