कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : थेट पाईपलाईन योजनेमुळे शहरातील नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पाणी मिळणार असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर शहराच्या विकासाला अधिक गती येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. कोल्हापूरकरांनी आ. सतेज पाटील यांच्या रूपाने चांगले नेतृत्व दिल्यामुळेच अवघड असे थेट पाईपलाईनचे जनतेचे स्वप्न साकार झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अनेक वक्त्यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या पूर्ततेसाठी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. सर्व पक्षीय गौरव समितीच्या वतीने थेट पाईपलाईन वचनपूर्ती लोकोत्सव मंगळवारी दसरा चौकात आयोजित केला होता. यावेळी थेट पाईपलाईन योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आ. सतेज पाटील यांच्यासह गेल्या चाळीस वर्षात योगदान देणारे सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, माजी महापौर, महापालिकेचे अधिकारी यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते.
राज्यात कोल्हापूरपेक्षा अनेक मोठी शहरे, महापालिका असताना परंतू केवळ सतेज पाटील यांची चिकाटी आणि सततचा पाठपुरावा यामुळे ही योजना पूर्णत्वास आली, असे सांगत चव्हाण म्हणाले, योजनेत अनेक अडचणी आल्या. मंजुरी मिळेपर्यंत 400 कोटीवर ही योजना गेली. केंद्र सरकार 40 टक्केच्या वर रक्कम देण्यास तयार नसल्याने 60 टक्के रक्कम देण्यास राज्य सरकारही तयार नव्हते. महापालिकेला एवढी रक्कम उभी करणे शक्यच नव्हते. त्यामुळे 60 टक्के निधीची तत्कालीन केंद्रिय नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्याकडे मागणी केली. त्यांनी मंजुरी दिली. 170 कोटीचा निधी महापालिकेला वर्ग केला. सरकार बदलल्यानंतर अनेक योजना रद्द झाल्या परंतू ही योजना मात्र आ. पाटील यांच्या चिकाटी आणि पाठपुराव्याने पुर्णत्वास गेली.
ही योजना आ. पाटील यांच्या ह्दयातील होती. त्यामुळे ही योजना तांत्रिकदृष्ट्या देखील अतिशय चांगली झाली आहे, असे सांगत चव्हाण म्हणाले, पुढील 25 वर्षातील लोकसंख्येला देखील पाणी पुरणार आहे. यापुढे महापालिकेला सांडपाण्याचे नियोजन करावे लागेल. जीवनासाठी जसे पाणी आवश्यक आहे तसेच औद्योगिकरणाच्या वाढीसाठी देखील स्वच्छ आणि मुबलक पाण्याची गरज असते, ते उपलब्ध झाल्याने कोल्हापूरचा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, नदी उशाला आणि कोरड घशाला अशी कोल्हापूरची अवस्था होती. मिळणारे पाणीही दूषीत होते. त्यामुळे थेट पाईपलाईनची योजना पुढे आली. गेल्या चाळीस वर्षापासून नागरिकांची ती मागणी होती. त्यासाठी आपण पाठपुरावा केला आणि यश आले. आपण निमित्त मात्र आहोत, या योजनेचा पाया रचण्याचे काम ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे, कै. के. आर. अकोळकर यांच्यासह आजच्या सत्कारमूर्तीनी केले आहे. योजनेत अनेक अडचणी आल्या. गेल्या आठ-नऊ वर्षात आपल्यावर खूप टीका झाली. पाईपलाईन झाली तरी माझ्यामुळे आणि नाही झाली तरी माझ्यामुळेच असे चित्र निर्माण झाले होते. आता आय.टी. पार्क आणि पंचगंगा प्रदूषण रोखण्याचे काम प्राधान्याने केले जाईल.
अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज यांनी कोल्हापूर जनतेला सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजना पूर्ण करण्याचे दिलेले वचन पूर्ण केले आहे. पाटील यांनी एकदा मनात आणलं किंवा एकदा ठरविले की ते करूनच दाखवितात. राजकीय नेतृत्व भक्कम असेल तर प्रश्न मार्गी लागू शकतात हे यावरून दिसून आल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, भारती पोवार, सतिशचंद्र कांबळे, दिलीप पवार, शिवाजी परुळेकर, अॅड महादेवराव आडगुळे, विजय देवणे आदिंची भाषणे झाली. स्वागत व प्रास्तावक समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी केले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आ. राजूबाबा आवळे, आ. जयंत आसगावकर, व्ही. बी. पाटील, माजी आ. सुरेश साळोखे, वसंत मुळीक, डॉ. मेघा पानसरे, चंद्रकांत यादव, बाबुराव कदम, सुनील मोदी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, संध्या घोटणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शहराच्या जवळपास सर्व प्रभागाीतल महिलांनी पाण्याचे कलश आणले होते.