

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : येथील मांडेकर गल्लीत गडहिंग्लज पोलिस ठाण्याकडील महिला कर्मचार्याच्या घरातच चोरट्याने डल्ला मारत तब्बल 9 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घरफोडीने चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
याबाबत माहिती अशी : पोलिस कर्मचारी गंधवाले या पती व सासूसह मांडेकर गल्लीमध्ये वास्तव्यास असून त्यांनी अयोध्यानगर कॉर्नर परिसरामध्ये फ्लॅट घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सासू माहेरी गेल्या, तर पती अयोध्यानगरमधील फ्लॅटकडे गेले होते. गंधवाले यांना रात्रीची ड्युटी असल्याने त्याही कामावर होत्या. हीच संधी साधून चोरट्याने त्यांच्या घराचा कडी-कोंयडा तोडून घरातील 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 7 ग्रॅमचे सोन्याचे झुमके, 5 ग्रॅमच्या कानातील साखळ्या, 3 ग्रॅमची अंगठी, 2 ग्रॅमची सोन्याची नथ असे एकूण 4 लाख 45 हजारांचे दागिने लंपास केले.
सकाळी महेश गंधवाले हे घरी येताच त्यांना घराचा कडी-कोंयडा तुटलेला आढळला. घरातील कपाट विस्कटून दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. दिवाळी चार दिवसांपूर्वी झाली असल्याने घरामध्येच दागिने असल्याची संधी साधून चोरट्याने थेट पोलिसाच्या घरी धाडसी चोरी केल्यामुळे गडहिंग्लज पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.