भाजपकडून सर्वसामान्यांची फसवणूक : आ. सतेज पाटील | पुढारी

भाजपकडून सर्वसामान्यांची फसवणूक : आ. सतेज पाटील

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. नोटाबंदी करून सामान्य माणसांची आर्थिक फसवणूक केली. हा पक्ष समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करत आहे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. प्रतिभानगर येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्य कौन्सिल आयोजित राज्यव्यापी महासंघर्ष यात्रेच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, राज्य घटनेने देशाला प्रगल्भ बनविले आहे; पण भाजपमुळे राज्यघटना धोक्यात आली आहे. सन 2024 मध्ये सत्तांतर करणे गरजेचे आहे. स्वाभिमानाने संघर्ष केला, तर दडपशाही केली जाते. भविष्यात एखाद्या प्रश्नावर संघर्ष करताच येणार नाही, इतकी दहशत भाजपने सुरू ठेवली आहे. ज्येष्ठ नागरिक, मध्यमवर्गीय इंडिया आघाडीसोबत आहेत. तरुणांनीही या आघाडीबरोबर राहिले पाहिजे; अन्यथा भविष्यात त्यांना महागाई, बेकारीचे चटके सहन करावे लागणार आहेत. सोशल मीडियाचा भडिमार सुरू असल्याने तरुण त्यांच्याकडे झुकला जात आहे; पण तरुणांनी जातीयवादी पक्षापासून सावध राहावे.

आ. जयश्री जाधव म्हणाल्या, लोकशाही टिकविण्यासाठी भाजपला हटवा. भारतीय कम्युनिट पक्षाचे राज्य सेक्रटरी सुभाष लांडे म्हणाले, कामगार एकत्र आले तर सत्ता उलथवून लावता येते हा इतिहास आहे. एकजूट ठेवून संघर्षाची तयारी ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, 2024 च्या निवडणुकीत बुद्धीजिवी लोकांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे म्हणाले, ब्राह्मणशाही ते भांडवलशाही विरोधात ही यात्रा आहे. देश वाचविण्यासाठी या संघर्ष यात्रेला राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतून सुरुवात केली आहे. ही यात्रा कोल्हापूर ते नागपूर जाणार आहे.

आयटकचे राज्य कोषाध्यक्ष कॉ. प्रकाश बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉ. दिलीप पोवार, व्यंकाप्पा भोसले, कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. सतीशचंद्र कांबळे, कॉ. मेघा पानसरे, कॉ. शुभांगी पाटील, कॉ. दिलदार मुजावर यांच्यासह मित्र संघटना, पुरोगामी, आंबेडकरवादी घटक पक्षांसह आयटकचे कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राज्यव्यापी महासंघर्ष यात्रेला झेंडा दाखवून सुरुवात झाली. स्वागत शाहीर सदाशिव निकम यांनी, तर आभार कॉ. एस. बी. पाटील यांनी मानले.

Back to top button