कोल्हापूर सेफ सिटी कधी? | पुढारी

कोल्हापूर सेफ सिटी कधी?

डॅनियल काळे

कोल्हापूर : शहराचा वाढता विस्तार आणि गुन्हेगारीचे प्रमाण पाहता या शहरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच असणे गरजेचे आहे. 2015 मध्ये राबविलेला सेफ सिटीचा प्रकल्प अपुरा आहे. गुन्हे रोखणे, वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे, सामाजिक शांतता प्रस्थापित करणे यांसह बहुफायदेशीर नव्या स्मार्ट सेफ सिटी प्रकल्पाची कोल्हापूरकरांना गरज आहे. सध्याच्या प्रकल्पात केवळ 65 ठिकाणे आणि 165 कॅमेरे आहेत. परंतु शहरात किमान 200 हून अधिक ठिकाणी 1000 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची गरज आहे. शहर वाय-फाय सीटी करण्याच्या वल्गना महापालिकेत झाल्या होत्या. परंतु किमान शहर सुरक्षित करणार्‍या प्रकल्पांसाठी तरी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.

कोल्हापूरचे विमानतळ विकसित झाले आहे. कृषी, व्यापार, उद्योग, पर्यटन या सर्वांच्याच द़ृष्टीने कोल्हापूरचे महत्त्व वाढत आहे. चारही बाजूंनी नागरीकरण वाढत आहे. परिणामी शहर हळूहळ अनेक बाबतीत संवेदनशील बनत आहे. मोर्चे, आंदोलने या तर शहरात नित्याच्याच बाबी बनल्या आहेत. त्यामुळे सर्व बाजूंनी शहर सुरक्षित असणे ही गरज आहे.

2015 मध्ये महापालिका आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या प्रयत्नातून शहरात सेफ सिटी टप्पा 1 हा प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पात शहरातील 65 ठिकाणी 165 कॅमेरे बसविण्यात आले होते. पोलिस मुख्यालयात त्याचे कंट्रोल रूम ठेवण्यात आले आहे. परंतु देखभाल दुरुस्तीच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित होताच महापालिकेने हा प्रकल्प पोलिसांच्या गळ्यात मारला आहे. देखभाल, दुरुस्तीअभावी गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पात अडथळे होते. ऑगस्ट महिन्यापासून पोलिसांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. परंतु या प्रकल्पावर खूपच मर्यादा आहेत.

शहरातील सर्व महत्वाचे चौक, पुतळे, धार्मिक स्थळे, वाहनतळ, सरकारी रुग्णालये, सरकारी कार्यालयासमोरचा परिसर, स्मशानभूमी तसेच शहरातील काही संवेदनशील वस्त्या, झोपडपट्ट्या आदी ठिकाणी आणखी काही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची गरज आहे. त्याद़ृष्टीने महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन अशा सर्व यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. चांगल्या दर्जाचा सर्व्हर, नाईटमोड असणारे दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत. पुणे, सोलापूर, छ. संभाजीनगर आदी शहरांत सुरक्षिततेसाठी अशा स्मार्ट प्रकल्पावर कोट्यवधीचा निधी खर्च झाला आहे.

Back to top button