Bidri Sugar Factory : बिद्रीसाठी चिन्हे वाटप; प्रचाराची चक्रे गतिमान

Bidri Sugar Factory : बिद्रीसाठी चिन्हे वाटप; प्रचाराची चक्रे गतिमान

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : बिद्री येथाल श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पॅनेलला चिन्हे वाटप झाली. सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला विमान व विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला कपबशी निवडणूक चिन्ह मिळाले. दोन्ही आघाड्यांनी कपबशी चिन्हासाठी दावा केला होता. यासाठी निवडणूक कार्यालयासमोर गर्दी केली होती. यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बिद्रीसाठी शुक्रवारी पॅनेल रचना झाली. त्यानंतर शनिवार व रविवारी निवडणूक कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे दुसर्‍या दिवशी चिन्हांचे वाटप होऊ शकले नाही. सोमवारी (दि. 20) चिन्हांचे वाटप करण्यात आले. 25 जागांसाठी दोन्ही पॅनेलचे 50 उमेदवार व अपक्ष 6 असे 56 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी व विरोधी या दोन्ही आघाड्या कपबशी या चिन्हासाठी आग्रही होत्या. त्यामुळे कोणते चिन्ह मिळणार या उत्सुकतेपोटी निवडणूक कार्यालयासमोर गर्दी झाली होती.

आघाड्यांनी वकीलही उपस्थित ठेवले होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्व परिस्थिती व मागणी अर्जाचा विचार करून सत्तारूढ गटाला विमान व विरोधी गटाला कपबशी चिन्ह दिले. अन्य सहा अपक्ष उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार चिन्हे दिली आहेत. 3 डिसेंबरला मतदान होत असून 5 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. चिन्ह मिळाल्यामुळे आता प्रचाराची चक्रे गतिमान होणार आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे म्हणाले, पोटनियम कायद्यानुसार ज्यांच्या पॅनेलची रचना अगोदर होऊन आमच्याकडे चिन्ह मागणीचा अर्ज अगोदर आला, त्यांना त्यांच्या पसंतीचे चिन्ह मिळते. सत्ताधारी आघाडीने पहिला अर्ज साडेनऊ वाजेपर्यंत दिला होता. पण त्या अर्जात 9 उमेदवार होते. विरोधी आघाडीने 25 उमेदवार पॅनेल रचनेचा 2 वाजून 20 मिनिटांनी अर्ज दिला होता. त्यानंतर 2 वाजून 28 मिनिटांनी सत्तारूढ आघाडीकडून पूर्ण पॅनेलचा अर्ज दाखल झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news