

राशिवडे, पुढारी वृत्तसेवा : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 27,562 पैकी 23,793 मतदान झाले. सरासरी 86.33 टक्के मतदान झाले. राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथे 218 पैकी 218 म्हणजेच शंभर टक्के तर कोदवडे येथे 97 टक्के इतके उच्चांकी मतदान झाले. सोमवारी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणी 36 टेबलवर होणार असून 300 कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भोगावतीसाठी सतारूढ आमदार पी. एन. पाटील गटाबरोबर राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, शेकापचे संपतराव पवार-पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांनी आघाडी केली होती. राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या माध्यमातून ते रिंगणात उतरले होते; तर माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, हंबीरराव पाटील, जालंदर पाटील, अजित पाटील यांची भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानीची शिवशाहू परिवर्तन विकास आघाडीही रिंगणात होती. माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक कै. दादासाहेब पाटील कौलवकर यांचे तिसरी आघाडी होती. दहा दिवसांच्या प्रचारमध्ये पाच दिवस दीपावली सणामध्ये गेले, त्यानंतर चार दिवसामध्ये प्रचारयंत्रणा गावोगावी पोहोचली. आरोप-प्रत्यारोपांचा धूरच निघाला, सोशल मीडियावर तर आरोपांचा दर्जाच घसरला होता.
आज दिवसभर ईर्ष्येने मतदान झाले. दुपारी 2 पर्यंत 60 ते 65 टक्के मतदान झाले होते. कार्यकर्त्यांमध्ये मतदारांना आणण्यासाठी चढाओढ सुरू होती. सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील, शेकापचे संपतराव पवार यांनी सडोली मतदान केंद्रावर, गोकुळचे अरुण डोंगळे यांनी घोटवडे येथे, पी. डी. धुंदरे यांनी राशिवडे केंद्रावर तर वसंतराव पाटील यांनी कंथेवाडी येथे मतदान केले. विरोधी शिवशाहू परिवर्तन विकास आघाडीचे नेते हंबीरराव पाटील यांनी हळदी येथे तर स्वाभिमानीचे जनार्दन पाटील यांनी परिते येथे, सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील यांनी कौलव येथे मतदान केले. तिन्ही पँनेल, आघाडीमध्ये पै-पाहुणे, नातलगांचा भरणा असल्याने फुटीर मतदानाची भीती आहे. सहा गटातील प्रत्येक गावात झालेले मतदान पुढीलप्रमाणे. कंसात एकूण मतदान.
कौलव 890 (1008), घोटवडे 848 (898), ठिकपुर्ली 914 (1042), सिरसे 383 (438), आमजाई व्हरवडे 314 (354), आवळी बु 531 (631), आणाजे 366 (387), खिंडी व्हरवडे 251(347), राशिवडे 1131 (1483), येळवडे 546 (595), कोदवडे (119), वाघवडे 247 (277), मोहडे 371 (394), चाफोडी (186), पुंगाव 467 (612), राशिवडे खुर्द (161), शिरगाव 609 (696), कांबळवाडी 241(267).
तरसंबळे 179(218), घुडेवाडी 167 (184), आवळी खुर्द 266 (313), कंथेवाडी 270 (305), तारळे खुर्द 286 (398), कुंभारवाडी 326 (385), कसबा तारळे 667 (810), पिरळ 330 (386), सोन्याची शिरोली 303 (374), कुडुत्री 222 (265), गुडाळ गुडाळवाडी 974 (1188), परिते 874 (974), म्हाळुंगे 671 (812), बेले 553 (655), कुरुकली 829 (954), कोथळी 547 (586), हळदी 614 (781), कुर्डू 460 (516), देवाळे 472 (527), कांडगाव 531 (722), वाशी 590(688).
सडोली खा. 830 (948), गाडेगौंडवाडी 276 (298), आरे 484 (550), बाचणी 751 (841), हिरवडे खा. 368 (429), हसूर दु. 633 (729), भाटणवाडी 207 (225), सोनाळी 387 (425), म्हालसवडे 510 (564), कांचनवाडी 266 (296). संस्था प्रतिनिधी गट 497 पैकी 365 मतदान झाले.