कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याचे राजकारण नेहमी नात्यागोत्यातच फिरत असते. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही. कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष उदय पाटील-कौलवकर हे सत्ताधारी आघाडीच्या पॅनलचे प्रमुख असून, त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी विरोधी पॅनलकडून दंड थोपटले आहेत. उदय पाटील हे धैर्यशील पाटील यांचे चुलते आहेत. के. पी. पाटील यांचे धैर्यशील हे जावई आहेत. त्यांच्याविरोधात सत्तारुढ आघाडीकडून के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील नेतृत्व करत आहेत.
गेली पाच वर्षे धैर्यशील पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात पी. एन. पाटील यांनी मोट बांधली आणि कारखान्यात सत्तांतर घडवून आणले. पी. एन. पाटील सध्या पॅनेल बाहेर राहून सत्तारुढ आघाडीचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत उदय पाटील – कौलवकर, ए. वाय. पाटील हेही आहेत. 34 वर्षांचा पी. एन. पाटील आणि संपतराव पवार-पाटील गटाचा संघर्ष थांबवून संपतरावांचे चिरंजीव क्रांतिसिंह सत्तारुढ आघाडीसोबत आहेत. ते निवडणूक लढवत नसले तरी त्यांचे चुलतभाऊ अक्षय अशोकराव पाटील सत्तारुढ आघाडीच्या पॅनलमध्ये आहेत.
सासरे विरुद्ध जावई
ए. वाय. पाटील गटाचे दिनकर बाळा पाटील यांच्या पत्नी रंजना याही सत्तारुढ पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे चुलत व्याही रघूनाथ जाधव हेही सत्तारुढ आघाडीमधून रिंगणात आहेत. धोंडिराम ईश्वरा पाटील हे पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत देत आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचेच जावई हंबीरराव पाटील लढत आहेत. हंबीरराव हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. जावई विरुद्ध सासरे या लढतीची चर्चा आहे.
पी. एन. पाटील यांचे चुलत बंधू संभाजीराव पाटील यांचे चिरंजीव विक्रांत पाटील हे चरापले गटाच्या परिवर्तन पॅनेलकडून नशीब आजमावत आहेत. संभाजीराव पाटील आणि पी. एन. पाटील हे पूर्वी या कारखान्यात एकत्र होते. कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांचा भाचा अजित पाटील नरके गटामार्फत चरापले गटातून निवडणूक लढवत आहे. भरत डोंगळे हे चरापले गटातून आपले चुलते महादेव डोंगळे (धैर्यशील पाटील गट) यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. धीरज डोंगळे हे सत्तारुढ पॅनेलमधून रिंगणात आहेत. ते गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे पुतणे आहेत.