‘बिद्री’साठी दुरंगी लढत; भाजपमध्ये दुही

‘बिद्री’साठी दुरंगी लढत; भाजपमध्ये दुही

बिद्री : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांसह गटाकडून 5, तर विरोधी गटाकडून 8 असे 13 विद्यमान संचालक पुन्हा रिंगणात उतरले आहेत.

शेवटच्या दोन दिवसांत घडामोडी घडत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व कारखान्याचे माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांचे मेव्हणे ए. वाय. पाटील हे विरोधी आघाडीत सामील झाले आहेत. तर 'भाजप'मध्ये फूट पडत भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला आहे. समरजितसिंह घाटगे यांचे समर्थक सुनीलराज सूर्यवंशी हे सत्तारूढ गटात समाविष्ट होत उमेदवारी मिळवली आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. गेली वर्षभर उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुक गट नेत्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे दोन्ही गटांकडून विविध गटांत 862 उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी आपणास मिळेल, या उद्देशाने दोन्हीकडे इच्छुक उमेदवार समर्थकांसह आले होते. सकाळपासून गटनेत्यांच्या बैठकीच्या फेर्‍या होत निवडणूक गट क्रमांकवार आपल्या पॅनेलची यादी बनविण्यात वेळ घेतला. यादी जाहीर होण्यास विलंब होत असल्यामुळे उमेदवार व समर्थकांत कमालीची उत्सुकता ताणली जात होती. दोन्ही आघाडींनी वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी याद्या जाहीर केल्या.

यादीत समावेश असलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, ज्यांचा समावेश नाही त्यांनी नाराजी व्यक्त केली; पण येत्या दोन दिवसांत ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नेतेमंडळी करतील असे वाटते. दोन्ही गटाने यादी जाहीर केल्यानंतर आपले उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांना विनंती केली.

सत्ताधारी गटाची श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीची स्थापना करून या आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, दिनकरराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे करत आहेत.

विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे नेतृत्व खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजितसिंह घाटगे, मारुती जाधव-गुरुजी, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे व भाजपचे नाथाजी पाटील आदी करत आहेत.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील काय भूमिका घेणार!

'बिद्री'च्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप विभागला गेला आहे. सत्तारूढ गटाकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई तसेच समरजितसिंह घाटगे यांचे समर्थक सुनील सूर्यवंशी सत्तारूढ गटात सामिल झाले आहेत. तर विरोधी गटात भाजपचे नाथाजी पाटील, बाबासाहेब पाटील, संजय यशवंत पाटील यांना संधी मिळाली आहे. दोन्ही आघाडीत भाजपचा समावेश असल्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील हे नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष असणार आहे.

माजी संचालक पुन्हा रिंगणात!

डी. एस. पाटील, सुनील सूर्यवंशी, पंडित केणे, नंदकिशोर सूर्यवंशी, दत्तात्रय उगले, के. जी. नांदेकर.

मुरगूडचे दोन्ही सख्खे बंधू परस्पराविरोधी!

मुरगूड गट 4 मधून सत्तारूढ गटाचे विद्यमान संचालक प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील व विरोधी गटातून 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष रणजितसिंह विश्वनाथराव पाटील हे दोन्ही सख्या भावांत हाय व्होल्टेज लढत होत आहे.

नात्या-गोत्यात होणार लढाई!

शुक्रवारी जाहीर झालेल्या पॅनेलमध्ये अध्यक्ष के. पी. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे मेहुणे-पाहुणे आणि मुरगूडचे प्रवीणसिंह व रणजितसिंह हे सख्खे भाऊ परस्परविरोधी पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. तर उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे व संचालक राजेंद्र पाटील हे मामा-भाचे गट क्रमांक एकमधून एकमेकांविरोधात लढत आहेत. अध्यक्ष के. पी. पाटील यांचे व्याही गणपतराव फराकटे, भाचे सुनील सूर्यवंशी हे एकाच पॅनेलमध्ये उमेदवार आहेत. माजी संचालक के. जी. नांदेकर व त्यांचे जावई जयवंत पाटील हे दोन आघाड्यांमधून निवडणूक लढवत आहेत. राधानगरी गट क्रमांक 1- मधून एकाच पॅनेलमधून तीन 'राजू' एकाच पॅनेलमधून उमेदवार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news