कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : पाटील आणि महाडिक समर्थकांत पाठिंब्यासाठी भेटीगाठीचा- पाठशिवणीचा खेळ | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : पाटील आणि महाडिक समर्थकांत पाठिंब्यासाठी भेटीगाठीचा- पाठशिवणीचा खेळ

कोल्हापूर : संतोष पाटील

विधान परिषद निवडणूक रणांगणात पुन्हा एकदा पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक गट आमने-सामने उभा ठाकला आहे. पालकमंत्री पाटील आणि महाडिक समर्थकांत पाठिंब्यासाठी भेटीगाठीचा- पाठशिवणीचा खेळ रंगला आहे. यानिमित्ताने पक्षीय परिघाबाहेरील भेटीगाठी आणि पाठिंब्याच्या आणा-भाका, बंद खोलीतील खलबते, वाटाघाटीची रंगतदार चर्चा सुरू आहे. कोण कोणाला पाठिंबा देणार, बहु‘मोल’ मत कोणाच्या पारड्यात टाकणार हे गुलदस्त्यात असून राजकीय घडामोडींमुळे मात्र जिल्ह्याच्या राजकारणात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील आदी महाविकास आघाडी एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, शौमिका महाडिक यांच्यासह भाजप आणि महाडिक गटाच्या शिलेदारांनी जिल्हाभर भेटीगाठीचा धडाका लावला आहे. तालुक्यातील नेत्याला तसेच मतदाराला सकाळी पालकमंत्री पाटील किंवा त्यांचे समर्थक भेटून गेल्यानंतर संध्याकाळी महाडिक गटापैकी कोणीतरी भेट घेत आहे. महाडिक भेटल्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्यापैकी कोणीतरी मतदारांशी संपर्क साधत आहेत. दोन्हीकडून एकमेकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून भेटीगाठीच्या निमित्ताने पाठशिवणीचा खेळ रंगला आहे.

भेटीगाठी घेण्यावरच नेतेमंडळी शांत बसत नाहीत, तर तालुक्यातील प्रमुख नेत्यांसह मतदारांशी एकटे तसेच गटाने बंद खोलीत चर्चा करत आहेत. बैठकीतील नेमका तपशील बाहेर पडू दिला जात नसला तरी संबंधिताचा आपणास पाठिंबा असल्याचे संकेत देत मतदान ‘फिक्स’ केल्याची पद्धतशीर पेरणी केली जात आहे. आमदार विनय कोरे यांचा पाठिंबा राहील, असा दावा सतेज पाटील यांनी केल्यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आपल्या बाजूला असतील, असे संकेत देत गुगली टाकली. पालकमंत्री पाटील तसेच महाडिक यांच्यापैकी कोणीही दारात आल्यानंतर जिल्ह्यात स्वागतच होणार आहे. हे खरे असले तरी यानिमित्ताने पडद्याआड होणारी चर्चा आणि त्यातील खरा-खोटा प्रसृत होणारा तपशील एकमेकांवर हबकी डाव टाकण्यासाठी वापरला जात आहे.

दावे-प्रतिदावे

दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते, शिलेदार आणि मतदार, संबंधित नेत्यांत रोज सुमारे शंभरपेक्षा जास्त बंद खोलीत होणार्‍या चर्चेमुळे राजकारण ढवळून निघत आहे. मतदारांची आकडेवारी सांगत दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक या दोन गटांत जिल्ह्याच्या राजकारणाची होत असलेली विभागणी येत्या काळात अधिक गडद होईल, मात्र या लढाईत कोणाचे ‘वजन’ अधिक होते ते मात्र निकालानंतर कळणार आहे.

Back to top button