राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडून कोल्हापूर पोलिसांचे कौतुक | पुढारी

राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडून कोल्हापूर पोलिसांचे कौतुक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : एका महिलेने मदतीसाठी 112 या पोलिस हेल्पलाईनवर फोन लावला. दोन ते तीन मिनिटांत प्रतिसाद मिळून समोरून माहिती घेण्यात आली. अवघ्या बार मिनिटांत संबंधित महिलेने सांगितलेल्या ठिकाणी पोलिस दाखल झाले. हा फोन अन्य कोणी नव्हे, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीच केल्याचे समोर आले. कोल्हापूर पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे चाकणकर यांनी कौतुक केले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन त्यांनी महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनाही जाणून घेतल्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर सोमवारी कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शनही घेतले. त्यानंतर महिला सुरक्षिततेबाबत केवळ माहिती जाणून घेण्याऐवजी मदत कशी मिळते, हे जाणून घेण्यासाठी एक फेक कॉल केला. हा कॉल कंट्रोल रूमला प्राप्त होताच कार्यवाही सुरू झाली. फोनचे लोकेशन पाहून जवळील पोलिस ठाण्याकडून मदतीसाठी पोलिस दाखल झाले. कोल्हापूर पोलिसांचे त्यांनी अभिनंदन केले. पोलिस मुख्यालयात भेट देऊन निर्भया पथक, महिला दक्षता कक्षातील कामकाजाची माहितीही घेतली. तसेच राज्यभरात अशी यंत्रणा तत्पर व्हावी, अशी अपेक्षाही यानिमित्ताने व्यक्त केली.

यानंतर चाकणकर यांनी कावळा नाका येथील अत्याचारग्रस्त, अन्यायग्रस्त महिलांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या वन स्टॉप सेंटरला भेट देऊन कार्यपद्धती समजावून घेतली. सेंटरच्या प्रमुख व संस्थेच्या अध्यक्षा वैशाली महाडिक यांनी उपक्रमाची माहिती दिली. तसेच उपक्रमाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. येथील इमारतीची डागडुजी व सुविधा उपलब्ध करण्याची विनंती त्यांनी चाकणकर यांच्याकडे केली. यावेळी उपाध्यक्षा प्रज्ञा यादव, सचिव सोनाली पाटील, अश्विनी पार्ले उपस्थित होत्या.

Back to top button