कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय एकट्याचे नव्हे… जनतेचे ! | पुढारी

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय एकट्याचे नव्हे... जनतेचे !

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी आणण्याचे स्वप्न कोल्हापूरकरांचे होते. दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी हे पाणी कोल्हापूरला येईल हे मी आधीच जाहीर केले होते. योजनेच्या मंजुरीपासून ते पूर्ततेपर्यंत अनेकांचा हातभार लागल्याने हे श्रेय कोणा एकाचे नाही तर ते जनतेचे आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत योजनेचे लोकार्पण होईल, असे वक्तव्य पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.

गेल्या दोन दिवसांपासून थेट पाईपलाईन योजनेचा श्रेयवाद रंगला असतानाच यामध्ये मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली. योजनेत 75 कोटींचा ढपला पाडल्याच्या आरोपकडे लक्ष वेधले असता ही योजना पारदर्शीच आहे. परंतु तशी चौकशी करण्याची कोणाची मागणी असेल तर योजनेच्या कामाचीही चौकशी करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्याची योजना पूर्ण झाली आहे. आता यामध्ये ऐनवेळी काही तांत्रिक अचडणी आल्या. कुटील राजकारणाचा डाव म्हणून वायरी कापणे, व्हॉल्व्ह लिक करणे असे प्रकार घडत असल्याचे सांगून मंत्री मुश्रीफ म्हणाले, थेट पाईपलाईनने कोल्हापूर शहराला पाणी आणण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी महापौर असताना रामभाऊ फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपोषण केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वत: मी आणि सतेज पाटील, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी सगळ्यांचेच श्रेय आहे. हे श्रेय कोणा एकाला घेता येणार नाही. सर्वांच्या हातभारामुळे योजनेला भरीव निधी मिळाला, ही वस्तुस्थिती आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

हा काय चोरीचा मामला आहे का?

आमची राजकीय भूमिका बदलल्याने हेच सर्व श्रेय घेतील, अशी भीती आमदार सतेज पाटील यांना वाटली असावी. त्यातूनच त्यांनी रात्रीतच पाण्याचे पूजन केले. काळम्मावाडीचे पाणी येणार याची माहिती मला जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली होती. सतेज पाटील यांनी घाई करत रात्रीतच पाण्याचे पूजन केले. हे सर्व दिवसाउजेडीच करावे अशी आमची इच्छा होती. रात्रीत असे करायला हा काय चोरीचा मामला होता का?असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

सुरक्षा रक्षकाकरवी थेट पाईपलाईनवर टेहळणी

थेट पाईपलाईनचे श्रेय मिळू नये म्हणून योजनेत खोडा घालण्यासाठी कुटील राजकारण सुरू आहे. त्यातून काळम्मावाडीवर वायरी कापणे, व्हॉल्व्ह लिक करणे असे घाणेरडे प्रकार सुरू आहेत. हे रोखण्यासाठी थेट पाईपलाईनच्या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा रक्षकांकडून टेहळणी केली जाईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

इचलकरंजीकरांनाही स्वच्छ आणि मुबलक पाणी देऊ

कोल्हापूरच्या पाण्याचा प्रश्न मिटला, इचलकरंजीचे काय, असा प्रश्न मुश्रीफ यांना विचारताच ते म्हणाले, पालकमंत्री म्हणून इचलकंरजीकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यांना मजरेवाडीतून कृष्णा नदीतून पाणी देण्याची योजना आखली जाईल.

Back to top button