कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांत इस्रायल युद्धामुळेे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली असून यामुळे ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. गुरुवार, 9 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण होऊन ते 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. यामुळे अनेक दिवसांनी सोने प्रथमच 60 हजार रुपयांच्या आत आले आहे. चांदीच्या भावातही घसरण झाली असून ती 70 हजार 300 रुपये (जीएसटी स्वतंत्र) प्रतिकिलोवर आली आहे.
नवरात्रौत्सवापासून सुरू असलेला सुवर्ण खरेदीचा उत्साह अद्यापही कायम असून धनत्रयोदशीच्या आधी सराफ बाजारपेठ गजबजून गेली आहे. विशेष म्हणजे, यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तापूर्वीच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सोने 62 हजार रुपयांच्या पुढे गेले होते, तर चांदीदेखील 73 हजार रुपयांवर पोहोचली होती; मात्र हे भाव कमी-कमी होत गेले. त्यात आता तीन दिवसांत सोन्याचे भाव 750 रुपयांनी कमी झाले आहे.
6 नोव्हेंबर रोजी सोने 60 हजार 970 रुपयांवर होते. ते कमी होऊन 8 नोव्हेंबर पर्यंत 60 हजार 480 रुपयांवर आले. 9 नोव्हेंबर रोजी त्यात पुन्हा घसरण होऊन ते 60 हजार रुपये प्रतितोळ्यावर आले आहे. चांदी तीन दिवसांत 950 रुपयांनी घसरली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी चोख सोने, पारंपरिक दागिने, साज, अंगठी, ब—ेसलेट, नाणी, वेढणी खरेदीसाठी लोक गर्दी करत असतात. दर कमी झाल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी अनेकजण खरेदीसाठी बाहेर पडतील, अशी शक्यता आहे, असे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राजेश राठोड यांनी सांगितले.