कोल्हापूर : नऊजणांच्या ६६ तास संघर्षानंतर पाण्याचा पाट मोकळा अन् सहाव्या दिवशी बालिंगा उपसा केंद्राचा पाणीपुरवठा सुरळीत | पुढारी

कोल्हापूर : नऊजणांच्या ६६ तास संघर्षानंतर पाण्याचा पाट मोकळा अन् सहाव्या दिवशी बालिंगा उपसा केंद्राचा पाणीपुरवठा सुरळीत

डॅनियल काळे

कोल्हापूर : डोक्यावर हेल्मेट आणि त्यावर एक बॅटरी… शरीराला बांधलेली घट्ट दोरी… इतकाच आधार… समोर दोन-अडीच फूट रुंद आणि 50 फूट खोल भुयार… काळाकुट्ट अंधार… दोरीच्या मदतीने, कसाबसा श्वास घेत, भुयारात उतरायचे, अन् पाट्यात अडकलेला एकेक दगड बाहेर काढायचा… नऊजणांचा सुमारे सहा दिवस, तब्बल 66 तास संघर्ष सुरू होता… या संघर्षानंतर तब्बल पाच डंपर दगड बाहेर काढले, माती बाहेर काढली, अन् सहाव्या दिवशी बालिंगा उपसा केंद्राचा पाणीपुरवठा सुरळीत झाला.

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या या केंद्रात भोगावती नदीचे पाणी पाटाने येते. याच पाटात महापुराने पडझड होऊन दगड अडकले. यामुळे केंद्रात येणार्‍या पाण्यावर परिणाम झाला. केंद्रात पाणी कमी येत असल्याने त्याचे परिणाम शहरात दिसू लागले. कारण याच केंद्रातून निम्म्या शहराला पाणीपुरवठा होतो आणि तो बंद झाला. शहरात गोंधळ उडाला. लोक रस्त्यावर आले आणि हा पाण्याचा पाट मोकळा करण्यासाठी संघर्ष करावा लागला.

सकाळ उजाडताच अंधार्‍या भुयारात उतरायचे, एकमेकांच्या आधाराने दगड, माती, काँक्रिट आदी पाटात पडलेले साहित्य बाहेर काढायचे, गुदमरल्यासारखे वाटले की पुन्हा कसरत करत वर यायचे, मोकळा श्वास घ्यायचा आणि पुन्हा भुयारात उतरायचे, अंधार पडत आला की काम थांबवून भुयारातून वर यायचे असा जणू नित्यक्रमच सहा दिवस सुरू होता.

काम सुरू असताना चेंबर कोसळले. पण, सुदैवाने कामगार बचावले. पुन्हा पाटात दगड पडू नये यासाठी लोखंडी छावणी घातली. त्यासाठीही जेसीबीतून भुयारात जाणे आणि काम आटोपून बाहेर येणे ही मोठी कसरतच होती. बघ्यांची गर्दी कमी होत नव्हती. त्यात लोकप्रतिनिधींचीही गर्दी होती. नऊजणांचा सुरू असलेला संघर्ष पाहून उपस्थित अवाक् होत होते. दुपारच्या सुमारास काम पूर्ण झाले आणि शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला.

महापुराने पाटाची पडझड

2019 आणि 2021 या दोन्ही वर्षी आलेल्या महापुराने या भुयारी पाण्याच्या पाटाची पडझड झाली. पाटात दगड-माती अडकली. पाण्याचा दाब कमी होऊ लागला. परिणामी सातत्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने हे काम हाती घेण्याची वेळ आली.

दानोळीकरांची जीवाची बाजी

पाण्याचा पाट रिकामा करण्याचे आव्हान दानोळीकरांनी घेतले. खोल भुयारी पाटात उतरून भोसले यारी ग्रुपच्या गजानन कवठेकर, विनोद तिवडे, अशोक भोसले, तानाजी कुंभोजे, आबू बिजले, विकास होंगळे, बलदेव बुधावले, प्रवीण तिवडे, नाजिर पठाण या कर्मचार्‍यांनी तुंबलेल्या 85 फूट भुयारी पाण्याच्या पाटातील एकेक दगड बाहेर काढत, पाण्याला मोकळी वाट करून दिली.

Back to top button