जयसिंगपुरात आज ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद | पुढारी

जयसिंगपुरात आज ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मंगळवारी (दि. 7) 22 वी ऊस परिषद होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘स्वाभिमानी’ने गत हंगामातील तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून 400 रुपये द्यावेत, तर चालू हंगामातील दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 522 किलोमीटरची आक्रोश पदयात्रा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत सुरू आहे. त्याची सांगता मंगळवारी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत होणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी चालू हंगामाचा दर किती मागणार, याकडे राज्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘स्वाभिमानी’च्या वतीने आक्रोश पदयात्रेदरम्यान दोन्ही जिल्ह्यांतील कारखान्यांना गत हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामातील निवेदने दिली आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजता आक्रोश पदयात्रा नांदणी (ता. शिरोळ) येथे येत आहे. त्यानंतर हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत पदयात्रा दुपारी जयसिंगपूर येथील ऊस परिषदस्थळी दाखल होणार आहे.

ऊस परिषदेसाठी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. पार्किंगसाठी शिरोळ रोड, दसरा चौक, मादनाईक पंपासमोर, झेले टॉकीज परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, मराठा मंडळ परिसरात सोय करण्यात आली आहे. दुपारनंतर सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी सोडण्यात येणार आहे. जयसिंगपूर पोलिसांच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विविध ठिकाणी सूचना फलक व स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button