दिवाळी खरेदीचा ‘सुपर संडे’ | पुढारी

दिवाळी खरेदीचा ‘सुपर संडे’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीचा सण आठवडाभरावर असून आजचा रविवार सुट्टीचा दिवस खरेदीसाठीचा ‘सुपर संडे’ ठरला. कोल्हापूरकरांनी कपडे, फराळ साहित्य, आकाशदिवे यांसह दिवाळीच्या साहित्य खरेदीला सहकुटुंंब गर्दी केली होती. महाद्वार रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, ताराबाई रोड, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी परिसरातील रस्ते वाहनांनी व्यापले होते. दुकानांमध्ये रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी रीघ लागली होती.

गुरुवार, 9 नोव्हेंबरला वसुबारसने दिवाळीची सुरुवात होत आहे. 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी तर रविवारी (दि. 12) नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आहे. दिवाळीच्या अगोदरच्या रविवारी खरेदीसाठी सर्वत्र गर्दी दिसून आली. महाद्वार रोड, राजारामपुरीतील कपड्यांच्या दुकानांसह ताराबाई रोड, जोतिबा रोड, शाहूपुरीतील दुकानांत दिवसभर खरेदीची लगबग सुरू होती. गांधीनगर बाजारपेठेत अक्षरश: पाय ठेवण्यासही जागा उरली नव्हती. गांधीनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची गर्दी झाल्याने तासन्तास वाहनांचा खोळंबा दिसून आला.

ताराबाई रोड, पापाची तिकटी, पानलाईन, बाजार गेट येथे आकाशदिवे खरेदीसाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली. पन्नास रुपयांपासून दोन हजार रुपयांचे विविध रंगाचे, आकाराचे आकाशदिवे उपलब्ध आहेत. यंदा कापडी प्रिंटेड आकाशदिवे लक्षवेधी ठरत आहेत. अशा आकाशदिव्यांच्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल होता.

रांगोळी, पणती, स्टीकर, रेडिमेड तोरण, झेंडूच्या फुलांच्या प्रतिकृती असणार्‍या प्लास्टिक माळांनाही मोठी मागणी आहे. रांगोळीही दहापासून पन्नास रुपयांच्या पाकिटात उपलब्ध करण्यात आली आहे. मातीच्या पणत्या, इलेक्ट्रिक पणत्याही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. पारंपरिक मेणाच्या यूज अँड थ—ो मेणबत्तीलाही मोठी मागणी दिसून येत आहे.

फराळाचे स्टॉल

फराळाची बाजारपेठही कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात चालते. साजूक तुपातील पदार्थ खरेदी करून आप्तस्वकीयांना परराज्यात, परदेशात पाठविण्यात येतात. कुरिअरच्या मदतीने परदेशातील आप्तेष्टांना फराळ पाठविण्याची लगबगही स्थानिकांकडून सुरू झाली आहे. मिरजकर तिकटी, जोतिबा रोड, बिनखांबी गणेश मंदिर, बिंदू चौक परिसरात असे स्टॉल उभारण्यात आले असून रेडिमेड फराळालाही कोल्हापूरकरांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

Back to top button