धनंजय महाडिक : पराभव दिसू लागल्यानेच २५२ मतदार असल्याची अफवा | पुढारी

धनंजय महाडिक : पराभव दिसू लागल्यानेच २५२ मतदार असल्याची अफवा

कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीचे 264 मतदार भाजपसोबत असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांना पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच 252 मतदार आपल्याकडे असल्याची ते अफवा पसरवत आहेत, अशी टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी येथे रविवारी केली.

भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे व नगरसेवकांच्या भेटीसाठी आले असता ते बोलत होते. माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा करून गेल्यानंतर धनंजय महाडिक, हाळवणकर यांनी सायंकाळी पाच वाजता नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. 264 मतदार भाजपसोबत असल्याचा दावा महाडिक यांनी केला. महाडिक म्हणाले, पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार.

या निवडणुकीत भाजपचा करिश्मा नक्कीच दाखवून देऊ. रामचंद्र डांगे यांच्याबरोबर महाडिक, हाळवणकर यांनी दोन तास बंद खोलीत चर्चा केली. यावेळी नगरसेवक अनुप मधाळे, उदय डांगे, दयानंद मालवेकर, उमेश कर्नाळे, आजम गोलंदाज उपस्थित होते.

Back to top button