स्वराज्य सौदामिनी ताराराणी आजपासून सोनी मराठीवर
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र, सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणार्या रणरागिणी ताराराणी यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका सोमवारपासून (दि. 15) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवारदरम्यान सायंकाळी 7.30 वाजता ताराराणींच्या इतिहासाचे पैलू उलगडणार असल्याची माहिती जगदंब क्रिएशनचे प्रमुख खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका निर्मिती करणारी जगदंब क्रिएशनची टीम, कलाकार यांनी रविवारी छत्रपतींची राजधानी असणार्या करवीरला (कोल्हापूर) भेट दिली. ताराराणी चौकातील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या परिसरात फुलांची सजावट, तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या सोहळ्याला शाहू महाराज, इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर, आनंद काळे उपस्थित होते.
सायंकाळी मालिकेचे निर्माते खा. डॉ. अमोल कोल्हे आणि कलाकारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार असल्याचे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले.