कोल्हापूर : ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून शिंदेवाडीचा तरुण ठार | पुढारी

कोल्हापूर : ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून शिंदेवाडीचा तरुण ठार

दोनवडे; पुढारी वृत्तसेवा : शिंदेवाडी (ता. करवीर) येथे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली ओंकार विलास पाटील (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे.

चालक ट्रॅक्टर घेऊन शिंदेवाडी गावातून ऊसतोड मजूर आणण्यासाठी निघाला होता. त्याच्या मागून ओंकार हा दुचाकी घेऊन चालला होता. ओव्हरटेक करत असताना समोरून गाडी आल्यामुळे त्याचा तोल गेला व ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून तो चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला.

ओंकार हा एकुलता मुलगा होता. त्याची बहीण विवाहित असून, वडील शेतकरी आहेत. ओंकार हा गावातीलच ट्रॅक्टर मिस्त्रीच्या हाताखाली काम करत होता. शुक्रवारी त्याला सुट्टी असल्यामुळे तो कामानिमित्त बाहेरगावी निघाला होता. त्याचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

Back to top button