ए. एस. ट्रेडर्स घोटाळा प्रकरण : कृती समितीच्या 5 जणांचे जबाब पूर्ण | पुढारी

ए. एस. ट्रेडर्स घोटाळा प्रकरण : कृती समितीच्या 5 जणांचे जबाब पूर्ण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटसह संलग्न कंपन्यांमधील कोट्यवधीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करून म्होरक्या लोहितसिंग सुभेदार याच्यासह संचालक, एजंटाची जेलवारी घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ए. एस. ट्रेडर्सविरोधी कृती समितीच्या पाच सदस्यांकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी गुरुवारी चौकशी केली. त्यांचे जबाब नोंदविले.

कृती समितीच्या सदस्यांनी ए. एस. ट्रेडर्समधील घोटाळ्यासंदर्भात तत्कालीन तपासाधिकारी स्वाती गायकवाड यांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन आरोप केले होते. कृती समितीच्यावतीने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. कंपनीतील गैरव्यवहाराची फेर चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती.

तक्रारीची दखल घेत पोलिस अधीक्षक पंडित यांनी तत्कालीन तपासाधिकारी तथा पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्याकडून तपास काढून घेत, आर्थिक गुन्हे अन्वेषणचे नूतन निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे तपास सोपविला आहे.

कृती समितीच्या तक्रारीनुसार पंडित यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक पत्की यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी चौकशीची प्रक्रिया गतिमान केली आहे. गुरुवारी (दि. 2) कृती समितीचे विश्वजित जाधव, रोहित ओतारी, अमित साळोखे, गौरव पाटील, महेश धनवडे यांचे जबाब नोंदविले.

उपअधीक्षक पत्की यांच्याकडून तत्कालीन तपासाधिकारी गायकवाड यांचीही अजूनही चौकशी सुरूच आहे. चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच त्याचा अहवाल पोलिस अधीक्षक पंडित यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. चौकशी अहवालाकडे कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Back to top button