निम्म्या कोल्हापुरात आजपासून पाणीपुरवठा होणार ठप्प | पुढारी

निम्म्या कोल्हापुरात आजपासून पाणीपुरवठा होणार ठप्प

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भोगावती नदीतील बालिंगा उपसा केंद्राच्या दगडी चॅनल दुरुस्तीचे काम गुरुवारपासून (दि. 2) सुरू केले जाणार आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत बालिंगा उपसा केंद्र पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, या केंद्रावर अवलंबून असलेल्या कोल्हापूर शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्डातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा ठप्प होणार आहे.

1947 सालातील चॅनलचे बांधकाम आहे. 2019 व 2021 मधील महापुराच्या कालावधीत चॅनल पूर्ण ढासळले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भोगावती नदीत पाणी पातळी जास्त असली तरीही बालिंगा उपसा केंद्रातून उपसा कमी होत होता. आता गेल्या काही दिवसांपासून उपसा अत्यंत कमी झाल्याने महापालिकेने दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. आता बालिंगा उपसा केंद्रातील दगडी चॅनल ढासळले आहे. त्यामुळे उपसा पूर्णतः बंद झाला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने मागणीनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी 40 टँकर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच शहरातील नागरिकांनी खाजगी मालकीच्या बोअरवरून आसपासच्या लोकांना खर्चाच्या पाण्याची सोय म्हणून त्यांच्या पाणी वापरण्यास द्यावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.

Back to top button