Maratha Reservation : करडवाडी येथे मराठा समाजाच्या वतीने कँडल मोर्चा | पुढारी

Maratha Reservation : करडवाडी येथे मराठा समाजाच्या वतीने कँडल मोर्चा

कडगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा सामाज्याला आरक्षण मिळावे व आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे मराठा समाजाच्या वतीने कँडल मोर्चा काढण्यात आला. यावेळी इतर जातीचेदेखील समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. ( Maratha Reservation )

संबंधित बातम्या 

गावातील मराठा समाज्यासह इतर समाज्यातील बांधव हनुमान मंदिर येथे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्रित जमले. यावेळी प्रवीण बेलेकर व गणेश खतकर यांनी मराठा आरक्षणाचे महत्व व आरक्षण का मिळाले पाहिजे? याबाबत आपआपल्या परखड भावना मांडल्या. त्यानंतर गावातून कँडल मोर्चा काढण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणा देण्यात आल्या. या कँडल मोर्चात लहान मुला-मुलींपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. मोर्चाचा शेवट एसटी बस थांब्याजवळ करण्यात आला. या मोर्चासाठी भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

मोर्चामध्ये सरपंच विनोद कांबळे, भुदरगड तालुका संघ संचालक बजरंग सुतार, उपसरपंच सागर खतकर, ग्रामपंचायत सदस्य- तंटामुक्त समिती अध्यक्ष संभाजी खतकर तसेच गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चासाठी डॉ. रणजीत मोरे, सोपान खतकर, उत्तम खतकर आदींनी संयोजन केले होते. आभार सोपान खतकर यांनी मानले. दरम्यान तालुक्यातील कडगाव येथेही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देणेसाठी मराठा समाज्याच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. ( Maratha Reservation )

Back to top button