जयंत पाटीलच सोबत येणार होते : मंत्री मुश्रीफ | पुढारी

जयंत पाटीलच सोबत येणार होते : मंत्री मुश्रीफ

कागल; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमच्यासोबत येणार होते. मात्र एका घटनेमुळे ते आले नाहीत, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. दोन दिवसांपूर्वी इचलकरंजीत एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी मुश्रीफ यांना आम्हीच तिकडे (भाजपसोबत) पाठवले आहे, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ बोलत होते.

शुक्रवारी सकाळी कागल येथे आपल्या निवासस्थानी आल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, जयंत पाटील यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही. एका घटनेमुळे ते आमच्या सोबत आले नाहीत. नाही तर ते आले असते आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली असती. ती घटना कोणती, ते का आले नाहीत, हे आता मी सांगणार नाही. ते सर्व गोपनीय आहे. वेळ आली तर कधीतरी सांगेन. परंतु ज्या पक्षाबरोबर आम्ही गेलो आहोत, त्या पक्षाशी इमान ठेवणे आणि त्यांच्यासाठी जीवाचे रान करणे हा आपला स्वभाव आहे, असेही ते म्हणाले.

Back to top button