

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा, ऊसाच्या साखर उताऱ्यात कधीकाळी परस्परांशी स्पर्धा करणारे साखर कारखाने अलीकडे उताऱ्यात (रिकव्हरी) चोरी करून शेतकऱ्यांना लुटत आहेत. नैसर्गिक उताऱ्यानुसार उत्पादित होणाऱ्या साखरेची दप्तरी नोंद न दाखवता सर्रास कारखान्यांनी हा लुटीचा उद्योग राजरोसपणे सुरू ठेवला आहे. असा घणाघाती आरोप मा. खा. राजू शेट्टी यांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे पदयात्रेदरम्यान झालेल्या कोपरा सभेत केला.सर्वच साखर कारखान्यांचे हिशेब माझ्याकडे उपलब्ध असल्याचे सांगत आयकर विभागाकडे तक्रार करून चौकशीचा ससेमिरा मागे लावणार असल्याचा सज्जड इशाराही शेट्टींनी साखर कारखानदारांना दिला आहे. (Raju Shetti)
दरम्यान शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा वाढीव प्रतिटन ४०० रुपये द्यावेत, या मागणीसाठी सुरू केलेली ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा बुधवारी (दि.२५) रात्री शाहूवाडी (थेरगाव) तालुक्यात प्रविष्ठ झाली. चरण येथील मुक्कामावरून सुरू झालेली ही पदयात्रा शुक्रवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता बांबवडे येथे दाखल झाली. यावेळी ग्रामपंचायत, व्यापारी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांचे पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. विशेषत: शेट्टी यांच्या पत्नी संगीता, पुत्र सौरभ, स्नुषा असा सर्व परिवार या पदयात्रेत सहभागी झाला होता.
राजु शेट्टी म्हणाले, यंदाचा ऊस गळीत हंगाम फेब्रुवारी महिन्याअखेरीस संपणार आहे. त्यामुळे ऊसासाठी कारखान्यांची स्पर्धा लागणार आहे. परंतु 'नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही' या तात्विक न्यायाप्रमाणे मागील हिशोबातील ४०० रुपये दिल्याशिवाय ऊसाला कोयता लावू देऊ नका. प्रसंगी कारखान्यांची साखर वाहने आडवा, वजनकाट्यावर निर्भीडपणे लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
यावेळी भाई भारत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अथणी शुगर (युनिट-२) प्रशासनाने सभास्थळी येऊन निवेदन स्वीकारले. सुरेश म्हाऊटकर यांनी स्वागत व प्रस्तावित केले. गणेश पाणीपुरवठा संस्था, बँक ऑफ महाराष्ट्र, व्यापारी संघटना आदींनी राजू शेट्टी यांना भेटून पाठिंबा व्यक्त केला. तसेच पदयात्रेच्या औचित्याने ठीकठिकाणी महिलांनी शेट्टी व त्यांच्या परिवाराचे आरती ओवाळून औक्षणही केले. पदयात्रेत वसंत पाटील, पद्मसिंह पाटील, रायसिंग पाटील, संतोष पाटील, राम लाड, काका पाटील, अजित साळुंखे, अवधूत जानकर आदींसह परिसरातील शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा