कोल्हापूर : विधान परिषद निवडणूक एकसंघपणे लढण्याचा निर्धार | पुढारी

कोल्हापूर : विधान परिषद निवडणूक एकसंघपणे लढण्याचा निर्धार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणूक एकसंघपणे लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. मतदारांच्या भेटीसाठी संपर्क दौर काढण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले.

विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील आज सकाळी कोल्हापुरात आले. या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मंत्री पाटील यांना निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आज सायंकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या वतीने आगामी विधानपरिषदेची निवडणूक एकसंघपणे लढण्याचा निर्धार करण्यात आला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास अनेक नेत्यांनी व्यक्त केला.

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दि. 10 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या बैठकीत मतदारांपर्यंत पोहचण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शनिवार (दि.13) पासून तालुकावार मतदारांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले. त्याच बरोबर जबाबदारीही निश्चित करण्यात आल्या.

बैठकीस पालकमंत्री पाटील यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक,आमदार पी एन पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजेश पाटील, आ. प्रकाश आबीटकर, आ. राजूबाबा आवळे, आ. ऋतुराज पाटील, माजी खासदार निवेदीता माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार , डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी.पाटील, माजी आ. के पी पाटील, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक डॉ सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.

Back to top button