Maratha Movement : राज्यभर मराठा आंदोलनाची धार तीव्र | पुढारी

Maratha Movement : राज्यभर मराठा आंदोलनाची धार तीव्र

कोल्हापूर; टीम पुढारी :  मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाची धार आता तीव्र झाली आहे. सर्वपक्षीय मंत्री, खासदार, आमदार यांना गावबंदी व सभा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. साखळी उपोषणालाही राज्यात अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शासनाला 24 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. आता आरक्षणाची लढाई आणखी तीव्र करण्याचा निर्धार जरांगे-पाटील यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार गावागावांत मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातल्या 109 गावांमध्ये राजकीय पुढार्‍यांना गावबंदी आहे, अशा आशयाचे फलक गावांच्या चौकाचौकात लागलेले आहेत. लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये, असे फलक दिसून येत आहेत.
मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारपासून हे साखळी उपोषण सुरू झाले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध 150 ठिकाणी आता साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.

नेत्यांविरोधातही आक्रोश

लातूर जिल्ह्यात पुढार्‍यांना गावबंदीच्या दोन घटना घडल्या आहेत. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना त्यांच्याच मतदारसंघातल्या एका गावामध्ये गाव प्रवेश करायला गावकर्‍यांनी बंदी केली. संजय बनसोडे यांना गावाच्या प्रवेशद्वारापासून परत फिरावे लागले. लातूर शहरचे आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्याही विरोधामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी केली.

बारामतीत रविवारी अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी (दि. 29) बारामतीतील सहयोग सोसायटीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ठरवून दिलेल्या दिशेनुसार बारामती शहर व तालुक्यात रविवारी लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे.

Back to top button