पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात | पुढारी

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात

कसबा बावडा : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून रीघ लावली होती. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथेही दादासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी 1984 साली कसबा बावडा येथे पहिले विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर कोल्हापूर, मुंबई व पुणे येथे डी. वाय . पाटील ग्रुपचा विस्तार करत अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, हॉस्पिटल, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांतील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणार्‍या संस्था सुरू केल्या. दादासाहेबांच्या दूरद़ृष्टी नेतृत्वातून आज 7 विद्यापीठे, 162 संस्था, 22 हजारांहून अधिक कर्मचारी, सव्वा चार लाखांहून अधिक माजी विद्यार्थी असा संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या दादासाहेबांनी रविवारी 89 व्या वर्षांत पदार्पण केले. या निमित्ताने शाहू महाराज यांनी निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी पद्मश्री त्यांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.

डी. वाय. पाटील मेडिकल तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सर्व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत दादासाहेबांनी केक कापून शुभेच्छा स्वीकारल्या. मेडिकल कॉलेज येथे पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत व टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथेही कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसमवेत दादासाहेबांनी केक कापला.

यावेळी सचिव श्रीपाद धरणगुत्ती, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कृषी आणि तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. ए. खोत, अभय जोशी, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, रजिस्ट्रार लितेश मालदे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. अभिजित माने, डॉ. सतीश पावसकर, डॉ. राजेंद्र रायकर, संजय जाधव, कृष्णात निर्मळ, अजित पाटील यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button