Navratri 2023 : खंडेनवमी विशेष : शौर्यशाली वारसा सांगणारी ‘ही’ आहेत मराठाकालीन शस्त्रास्त्रे | पुढारी

Navratri 2023 : खंडेनवमी विशेष : शौर्यशाली वारसा सांगणारी 'ही' आहेत मराठाकालीन शस्त्रास्त्रे

सागर यादव

कोल्हापूर : प्राचीन भारतीय कृषी संस्कृतीच्या नवरात्र उत्सवातील महानवमी या तीथीला खंडेनवमी म्हणतात. खंडेचा मूळ शब्द खांडा म्हणजेच खङ्ग किंवा तलवार होय. सैनिकी परंपरा जपणारे किंवा शस्त्रास्त्रे धारण करणारे सर्व समाज खंडेनवमीचा सण विविधतेने साजरा करतात. किंबहुना विजयादशमी सीमोल्लंघनाची सुरुवात शस्त्रास्त्रांच्या पूजनानेच होते. शौर्यशाली वारसा सांगणारी मोठी परंपरा मराठा साम्राज्याला लाभली आहे.

शिवछत्रपतींच्या दूरद़ृष्टी व बुद्धिचातुर्याच्या मार्गदर्शनाखाली मराठा साम्राज्याची सैनिकी परंपरा आणि त्यांच्या प्रभावी शस्त्रास्त्रांचा विकास झाला. या शौर्यशाली वारशाच्या पाऊलखुणा शस्त्रांच्या रूपाने विविध वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतात. राजघराणी, सरदार-जहागिरदार, खासगी संग्राहक व इतिहास संशोधक-अभ्यासकांकडेही शस्त्रास्त्रे आहेत.

तलवार : अत्यंत प्रभावी शस्त्र. जगातील अनेक राष्ट्रांच्या ध्वजावर, बोधचिन्हांवर, नाण्यांवर, चित्रांमध्ये तलवारींना विशेष स्थान आहे. शूरवीरांच्या सन्मानासह लग्न व धार्मिक समारंभात तलवार पूजनीय आहे. राजवटीनुसार तलवारींचे विविध प्रकार निर्माण झाले. तलवारीच्या मुठीवरून सुमारे 40 उपप्रकारांसह नख्या, खजाना, ठोला, परज, गंज्या, नाळ अशा तब्बल 22 भागांत तिची विभागणी होते. मराठा तलवार अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आली होती.

कट्यार : छोट्या शस्त्रांपैकी सर्वात प्रभावी असणार्‍या कट्यारीचा उगम महाराष्ट्रात झाल्याने हे मराठा शस्त्र म्हणून ओळखले जाते. मराठा सैनिकाच्या कमरेला शेल्यात कट्यार असायची. कट्यारीचे बिचवा, खान्ज्राली, खंजीर, पेशकब्ज, किंदजल, कुकरी, जांबिया, कर्द असे विविध प्रकार आहेत. मराठा पद्धतीची कट्यार अखंड ओतलेली (जोड नसलेली) 10 ते 20 इंच लांब मजबूत असते. मानकर्‍यांच्या कट्यारीवर सोन्याचांदीचे कलाकुसर तर स्त्रिया व मुलांकरिता लहान आकाराच्या वजनाला हलक्या असायच्या. मराठा समाजात लग्नसमारंभात कट्यारीच्या साक्षीने क्षात्रधर्म न विसरण्याची शपथ घेतली जाते.

वाघनख : सर्वात लहान पण अत्यंत प्रभावी छुपं शस्त्र. अफझलखानाला शिवछत्रपतींनी याच शस्त्रास्त्राने ठार मारले. प्रत्येक मराठा सैनिकाकडे वाघनख असायचेच. लढाईबरोबरच जंगल, सह्याद्रीच्या कडे-कपार्‍यातील मार्गावरून, गडकोटांच्या तटा-बुरुजांवर आणि उंच झाडांवर चढाई करण्यासाठी वाघनखांचा अत्यंत महत्त्वपूर्ण वापर केला जायचा.

विटा : भाल्याच्या कुळीतील विटा हेही एक मराठा अस्त्र म्हणून ओळखले जाते. बुमरँगप्रमाणे शत्रूवर आघात करून परत येणारे हे शस्त्र. शिवकाळात मराठा सैन्यात तिरंदाज व भालाईताप्रमाणेच विटेकर्‍यांची स्वतंत्र तुकडी असायची. दहा तलवारधार्‍यांवर एक पट्टेकरी भारी, तर दहा पट्टेकर्‍यांविरोधात एक विटेकरी भारी असे समीकरण होते. काठी, पोलादी टोक आणि दोरीचा वापर करून तयार केलेल्या या शस्त्रास्त्राच्या साहाय्याने 15 ते 20 फुटांवरील किंवा हत्ती-घोडे व उंटावरील शत्रूसैनिक टिपला जायचा.

पट्टा : पट्टा या शस्त्राचा वापरही मराठा सैन्यात मोठ्या प्रमाणात झाला. उव्या हातात पट्टा व डाव्या हातात दांड घेऊन शत्रू सैनिकांना दूर ठेवून त्यांच्यावर वार करण्यासाठी या शस्त्राचा प्रभावी वापर झाला. पट्टा घडवतानाही अनेक महत्त्वपूर्ण बदल शिवछत्रपतींच्या शस्त्रागारात केले होते.

कुर्‍हाड, भाला, गोफण

मराठा सैन्यात बहुतांशी शेतकरी असायचे, यामुळे त्यांची शस्त्रे दोन्ही कामांना उपयोगी ठरणारी होती. कुर्‍हाड, भाला, गोफण या शस्त्रांचा यात समावेश होता. डोंगरदर्‍याच्या उंच-सखल भागातून चालताना भाल्याचा, जंगलातून चालताना कुर्‍हाडीचा आणि शेतीकामासह दूरवर असणार्‍या शत्रूला टिपण्यासाठी गोफणीचा वापर केला जायचा.

Back to top button