हॉटेल पर्लचे संचालक बाळासाहेब घाटगे यांचे निधन

हॉटेल पर्लचे संचालक बाळासाहेब घाटगे यांचे निधन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथील प्रसिद्ध हॉटेल पर्लचे संचालक व्यंकटेश ऊर्फ बाळासाहेब सखाराम घाटगे यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी रमादेवी, दोन बहिणी, मुलगा विजय, सून कविता, नातवंडे असा परिवार आहे.

बाळासाहेब घाटगे यांचे शालेय शिक्षण बेळगाव येथील किंग जॉर्ज संस्थेत झाले व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात झाले. हॉटेल व्यवसायाची आवड असल्याने 1960 साली त्यांनी हॉटेल पर्लची स्थापना केली. ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा दिल्याने अल्पावधीतच हॉटेल पर्लचा ग्राहकवर्ग संपूर्ण महाराष्ट्रात तयार झाला. हॉटेल व्यवसायाबरोबरच कोल्हापुरात पहिले गोल्फ ग्राऊंड त्यांनी तयार केले. क्रिकेट खेळण्याची त्यांना आवड होती. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य होते. किर्लोस्कर कंपनीच्या डिझेल इंजिनचे अधिकृत विक्रेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. काही शैक्षणिक संस्थांना ते मदत करत होते.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. माळी कॉलनी येथील निवासस्थानापासून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. हॉटेल पर्ल येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले. यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शाहू महाराज, दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, उद्योजक मोहन घाटगे, सतीश घाटगे, तेज घाटगे, किरण पाटील, बाळ पाटणकर, सचिन मेनन, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर, व्ही. बी. पाटील, विश्वविजय खानविलकर, आनंद माने, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, प्रसाद कामत, अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण तसेच उद्योग, हॉटेल व्यवसायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाविसर्जन रविवारी (दि. 22) सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news