विशाळगड : निखळलेले दगड… गंजलेली लोखंडी शिडी… रस्त्याची दयनीय अवस्था.. दगडी पायरी मार्गाचा धोकादायक प्रवास… प्रवेशद्वारावरील स्मृतिस्तंभाची झालेली दुरवस्था… उखडलेला रस्ता… पेव्हिंग ब्लॉकची दुरवस्था हे चित्र आहे. ऐतिहासिक पावनखिंडीचे. याबाबत पर्यटकांतून नाराजीचा सूर उमटत असून खिंडीचे ऐतिहासिक वैभव धोक्यात आले आहे. तरी संबंधित विभागाने त्वरित डागडुजी करण्याची मागणी पर्यटक, इतिहास प्रेमींतून जोर धरू लागली आहे. (Pawankhind)
'पन्हाळगड ते विशाळगड' या मार्गावर घडलेल्या या स्फूर्तिदायी इतिहासाच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने पावनखिंडीत सुमारे पावणे दोन कोटी रुपयांच्या निधीतून वीस फुट उंचीचा स्मृतीस्तंभ, ओढयावरील पूल, पेव्हिंग ब्लॉक, दगडी पायऱ्या, पार्किंगचे फरसबंदी दगड आदींची उभारणी केल्याने खिंडीला ऐतिहासिक उजाळा मिळाला. 'स्फूर्तिदायी इतिहासाला साजेसे स्मारकामुळे इतिहास, निसर्ग प्रेमींबरोबरच पर्यटकांच्या आकर्षणाचे हे केंद्र म्हणून नावारुपाला आले आहे. (Pawankhind)
सर्व बांधकाम दगडी आहे. मात्र अलीकडे प्रत्येक भागाचे दगड निखळू लागल्याने बदललेले दृश्य धोक्यात आले आहे. येथे पर्यटनासाठी पर्यटकांची तोबा गर्दी असते. काही हुल्लडबाज तरुणांची टोळकीही येथे येते. त्यांच्याकडून मोबाईल सेल्फीसारखे प्रकार सुरुच असतात. उंच टेहळणी बुरुजाला कोणत्याही प्रकारची संरक्षण यंत्रणा नसल्याने संरक्षक ग्रील उभारण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे. खिंडीत जाणाऱ्या दगडी पायऱ्याचे अनेक दगड निखळले आहेत. काही निघून बाजूला पडले आहेत. ते तातडीने त्याच्या जागी न बसवल्यास ते हरविण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरा दगड बसविण्यासाठी नाहक नवा खर्चही करावा लागणार आहे. यामुळे निखळलेले दगड ताबडतोब चिरेबंद करण्यात यावेत, अशी मागणी पर्यटक व इतिहासप्रेमींमधून होत आहे.
पावनखिंडीचा विकास झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. खिंडीत जाणाऱ्या पायऱ्या मार्गाचे दगड निखळू लागले असून खिंडीतील लोखंडी शिडी धोकादायक आहे. खिंडीचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता त्वरित दुरुस्ती करणे काळाची गरज आहे.
– प्रमोद माळी, पर्यटन मार्गदर्शक
हेही वाचा