कोल्हापूर : शेतकर्‍यांचा आवाज दिल्लीत पोहोचणार का? | पुढारी

कोल्हापूर : शेतकर्‍यांचा आवाज दिल्लीत पोहोचणार का?

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या मैदानात हलगी वाजविण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. विशेषतः, हातकणंगले मतदारसंघात पक्षाने संकेत देण्यापूर्वीच उमेदवारांनी लंगोट बांधले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची कोंडी करण्यासाठी त्यांचे एकेकाळचे ज्येष्ठ सहकारी सदाभाऊ खोत यांनी बैठका काढण्यास सुरुवात केली आहे; तर शेट्टींचे एकेकाळचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि गेल्या निवडणुकीत चूल मोडून सवतासुभा उभारणारे शिवाजी माने यांनी आखाडा उपसण्याचे काम सुरू केले आहे. या तीन शेतकरी नेत्यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटल्याने आगामी काळात मतदारराजा कोणाच्या पाठीवर माती टाकतो, हे येणारा काळच ठरवेल; पण या सर्व खेळामध्ये यंदाच्या लोकसभेत शेतकर्‍यांचा आवाज दिल्लीत पोहोचणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध तगडे आव्हान उभे करण्यासाठी 2013 च्या सुमारास तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मोठी भूमिका बजावली होती. भाजप-सेना युती अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले आणि शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे या चार संघटनांच्या नेत्यांना एकत्र आणून आघाडी तयार केली. या आघाडीच्या बाहेरून मिळालेल्या समर्थनाने राजू शेट्टी 2014 च्या निवडणुकीत दुसर्‍यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि पुढच्या विधानसभेतही या चार पक्षांच्या मतांचा टेकू मिळाल्याने युतीही पुन्हा सत्तेत आली आणि देवेंद्र फडणवीस वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले; पण गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यावर मित्रपक्षांचा एकत्रित घरोबा फार काळ टिकला नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटना मित्रपक्षात होती, तेव्हा शेट्टींबरोबर सदाभाऊ खोत नावाची मुलूखमैदान तोफ धडाडत होती. शिवाजी माने खांद्याला खांदा लावून लढत होते. सोबतीला उल्हास पाटील होते; पण शेतकर्‍यांचे हे संघटन आणि पर्यायाने शेट्टींचे वजन कमी करण्यासाठी पंख छाटणीचा उद्योग सुरू झाला. कोणाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धूप घातला गेला, तर कोणामागे आर्थिक पाठबळ उभे केले गेले. याला पहिले बळी पडले, ते सदाभाऊ खोत. उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर फड गाजविणार्‍या या नेत्याच्या गळ्यात भाजपने शेला अडकविला. याचा शेट्टींना मनस्वी संताप झाला. यातूनच स्वाभिमानी-भाजप यांचा काडीमोड झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजी मानेही अलग झाले. याखेरीज प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने शेट्टींची मते फोडली आणि संपूर्ण देशभरात दोन डझन शेतकरी संघटनांना एकत्रित आणून त्याचा महासंघ निर्माण करणार्‍या शेट्टींचा लोकसभेतच पराभव झाल्याने शेट्टींभोवती लावलेली व्यूहरचना यशस्वी झाली.

2019 च्या लोकसभेचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. तुम्ही मला एक रुपया द्या, मी दिल्लीचे तख्त भेदून शेतकर्‍यांचा आवाज पोहोचवितो, अशी घोषणा करून जिल्हा परिषद, राज्याची विधानसभा आणि त्यापाठोपाठ सलग दोन वेळेला लोकसभा गाठणार्‍या राजू शेट्टींना यंदा चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात भाजप-शिंदेंची शिवसेना-राष्ट्रवादी यांची आघाडी असल्यामुळे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीसाठी शिंदे आग्रही राहणार, हे स्पष्ट असले, तरी सदाभाऊ खोतांनी लंगोट बांधून लकडकोटाभोवतीने फेर्‍या मारण्यास सुरुवात केली आहे.

शिवाजी माने यांनीही मेळावा घेऊन उमेदवारीचा लंगोट चढवत शेट्टींवर निशाणा साधला आहे. याखेरीज आता नव्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत समाज समितीत प्रवेश केलेले रघुनाथदादा पाटील हेही लंगोट घालण्याच्या तयारीत आहेत. एकाच मतदारसंघात चार शेतकरी नेत्यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लढाई शेतकर्‍यांच्या एकत्रित मतपेढीवर परिणाम करू शकते. यामुळेच यंदाच्या निवडणुकीत शेतकर्‍यांचा आवाज दिल्लीत पोहोचणार की पानिपतात थबकणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button