जिल्हा परिषद कोल्हापूर : भारीच…! झेडपी शाळांतील पटसंख्या वाढली | पुढारी

जिल्हा परिषद कोल्हापूर : भारीच...! झेडपी शाळांतील पटसंख्या वाढली

कोल्हापूर; विकास कांबळे :

जिल्हा परिषद कोल्हापूर : बूट, टाय आणि आकर्षित करणारे रंगीत गणवेश, रंगरंगोटी केलेल्या उंच इमारती, बागबगीचा यामुळे खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये मुलांना घालण्याकडे पालकांचा कल वाढत असल्यानेे जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या शाळांमधील मुलांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, यावर्षी जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या 7 हजार 118 ने वाढली आहे.

कोरोनामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांनादेखील शक्य आहे त्याठिकाणी ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. डिजिटल शाळांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद आघाडीवर आहे. तरीही दुर्गम व डोंगराळ भागात अजूनही रेंज उपलब्ध होत नसल्याने काही शाळांमधील मुलांचे शिक्षण बंदच आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर : ग्रामीण भागातील नागरिकांचा जि.प.शाळांवर विश्वास

गुणवत्तेत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जि.प.च्या शाळा पुढे आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत अजूनही कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शाळांतील मुलांची संख्या अधिक असते. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमधील शिक्षक विविध उपक्रम राबवितात, शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी जादा तास घेतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा जि.प.शाळांवर विश्वास आहे. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनेही विशेष उपक्रम राबविले जातात. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढली आहे. करवीर तालुक्यात सर्वाधिक 1790 पटसंख्या वाढली आहे. आजरा तालुक्यातील पटसंख्या मात्र गेल्या वर्षीपेक्षा 67 ने कमी झाली आहे.

  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1977
  • पहिली ते पाचवी शाळा 1111
  • पाचवी ते आठवी शाळा  866
  • विद्यार्थी संख्या  165684
  • शिक्षक संख्या  8091

तालुकानिहाय वाढलेली पटसंख्या

तालुका             पटसंख्या

भुदरगड              236
चंदगड                460
गडहिंग्लज           295
गगनबावडा            41
हातकणंगले        1091
कागल                706
करवीर              1790
पन्हाळा               647
राधानगरी            185
शाहूवाडी            559
शिरोळ              1175

Back to top button