कोल्हापूर : मान्सूनने यंदा देशातून दोन आठवडे आधीच काढता पाय घेतल्याचे हवामान खात्याने नुकतेच जाहीर केले आहे. अर्थात पावसाळा संपला आहे. मात्र राज्याच्या द़ृष्टीने चिंतेची बाब म्हणजे पावसाळा संपत असताना राज्यातील धरणांमध्ये केवळ 63 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 90 टक्के होता. मराठवाड्याची अवस्था तर यंदा चिंताजनक आहेच; पण पुणे, नाशिक आणि अमरावती विभागालाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. एकूणच आगामी साडेसात महिन्यांत राज्याच्या राशीला 'पाण्याची साडेसाती' लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यात साधारणत: एक जून ते 15 ऑक्टोबर हा पावसाळ्याचा कालावधी समजला जातो. त्यातही ऑक्टोबरमधील पंधरा दिवस हे परतीच्या पावसाचे समजले जातात. मात्र मान्सूनने यंदा पंधरा दिवस आधीच परतीची वाट धरल्याचे एव्हाना स्पष्ट झाले
आहे. परिणामी राज्यातील पाणीसाठाही यंदा अपेक्षेइतका झालेला नाही. राज्यात मोठे, मध्यम आणि लहान मिळून एकूण 2994 प्रकल्प (धरणे) आहेत. या सर्व धरणांची मिळून पाणी साठवण क्षमता 1703 टीएमसी इतकी आहे. मात्र आजघडीला या सर्व धरणांमध्ये मिळून 1082 टीएमसी म्हणजेच केवळ 63 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत म्हणजे आणखी साडेसात महिने राज्यातील जनतेला या अपुर्या पाणी साठ्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.
राज्यात एकूण 139 मोठी धरणे आहेत. त्यापैकी केवळ 41 धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. अर्थात भरलेली धरणे म्हणजे काही फार मोठी धरणे नाहीत; तर त्या त्या भागातील लोकांची पाण्याची गरज भागवतील अशी 5 ते 10 टीएमसी इतक्या मर्यादित क्षमतेची धरणे आहेत. मात्र ज्या धरणातील पाण्यावर जवळपास निम्म्या-अर्ध्या राज्यातील जनतेचे जीवनमान अवलंबून असते, अशी कोयना, उजनी, जायकवाडी, गोसीखुर्द, मांजरा, मुळा, गिरणा, धोम, कण्हेर अशी प्रमुख मोठी धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरलेलीच नाहीत. कोयना धरण तर 2003 सालानंतर यंदा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरू शकलेले नाही. परिणामी राज्याच्या वीज निर्मिती आणि सिंचनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा सर्वाधिक बिकट अवस्था मराठवाड्याची झालेली दिसत आहे. कारण औरंगाबाद विभागातील 920 धरणांमध्ये केवळ 40.61 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील 537 धरणांमध्ये मिळून 77.86 टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील 720 धरणांमध्ये मिळून 80.98 टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील 261 धरणांमध्ये 83.43 टक्के पाणीसाठा आहे. याचा अर्थ लगेच नसल्या तरी उन्हाळ्याच्या दिवसांत पुणे, अमरावती आणि नाशिक विभागालाही काही प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात मात्र यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे 90 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
राज्यातील पूर्ण क्षमतेने न भरलेली मोठी धरणे
कोयना, उजनी, जायकवाडी, खडकवासला, गोसीखुर्द, तोतलाडोह, इसापूर, माजलगाव, मांजरा, येळदरी, लोअर दुधना, मुळा, गिरणा, दूधगंगा, पिंपळगाव-जोगे, माणिकडोह, पवना, टेमघर, धोम बलकवडी, धोम, कण्हेर, उरमोडी, वीर, तिलारी आणि लोअर चोंधे ही मोठी धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. परिणामी राज्यातील ऊर्जा निर्मिती आणि सिंचनावर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.