

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद : विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदेची शुक्रवारी (दि.12) बोलाविण्यात आलेली सर्वसाधारण सभा घेता येणार नाही. तसे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी झेडपीला दिले आहे. यामुळे सर्वसाधारण सभेसह जलव्यवस्थापन समितीचीही बैठक होणार नाही. दरम्यान, सर्व पदाधिकार्यांनी बुधवारी आपली वाहने जमा केली.
मंगळवारी विधानपरिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे झेडपी प्रशासनाने सर्व पदाधिकार्यांना वाहने जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच प्रमाणे सर्वसाधारण सभेबाबतही जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकार्यांकडे मार्गदर्शन मागितले होते. जिल्हाधिकारी रेखावार यांनी झेडपीला पत्र पाठवून सर्वसाधारण सभा घेता येणार नाही, असे कळविले आहे.
पत्रात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता जि प सदस्य मतदार असल्याने आणि सभांमध्ये होणार्या चर्चेवर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने आचारसंहिताभंगाची शक्यता आहेे. त्यामुळे सभा निवडणूक झाल्यानंतर घ्यावी.
आचारसंहितेमध्ये धोरणात्मक निर्णय न घेता कामाचा आढावा घेता येऊ शकतो. जि.प.सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा अधिकार कोणालाच नाही. प्रशासन जि प सदस्यांच्या अधिकारावर का गदा आणत आहे? असा सवाल राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.