लवंगी मिरची : उधारीचे वांदे

लवंगी मिरची : उधारीचे वांदे

काय झाले बघ मित्रा, हे यूपीआय आल्यापासून उधारी परत करणार्‍यांचे फार मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. पूर्वी कुणाकडून पैसे उधार घेतले की, तो सांगत असे शुक्रवारी देतो, सोमवारी देतो आणि त्या ठरलेल्या दिवशी फोन केला की, उधारी घेणारा सांगत असे की, बँक उघडल्यावर देतो. म्हणजे पुन्हा तीन चार दिवस गेले की, उधारी परत करणारा गायब होत असे. त्यामुळे लोकांनी एकमेकांना उधारी देणे बंद केले होते.

हो बरोबर आहे तू म्हणतोस ते! ज्याच्याकडे पैसे नाहीत तोच उधारी मागतो आणि उधारी परत करेपर्यंतही त्याच्याकडे पैसे नाही आले, तर तो टोलवाटोलवी करायला सुरुवात करतो. आता हे मोबाईलमध्ये यूपीआय प्रकरण आल्यापासून जो धनको आहे तो ऋणकोला थेट गाठतो. आपला मोबाईल पुढे करतो आणि सांगतो की, आताच्या आता ट्रान्सफर कर. त्यामुळे उधारी करणे आजकाल अवघड झाले आहे, असे नेहमी उधारी घेणार्‍या एका मित्राने सांगितले तेव्हा आम्ही चकीत झालो. ही गोष्ट आमच्या लक्षात आली नव्हती.

म्हणजे बघ, आधुनिक तंत्रज्ञानाने मानवाची किती मोठी सोय केली आहे. त्यामुळे उधारीला चांगलाच आळा बसला आहे. उधारी वसूल करणारा समोर असला आणि त्याने स्कॅन पुढे केले की, त्याला उधारी फेडावी लागते.

हो पण, त्याला बरेचदा एक पर्याय असतो. उधारी फेडणारा म्हणतो की, नंतर करतो. येथे रेंज नाहीये. रेंज नसेल तर उधारी वसूल करणारा त्याला हॉटस्पॉट वरून वायफाय देतो. ते काही नाही. आताच्या आता उधारी परत कर एवढाच त्याचा धोशा असतो. तंत्रज्ञानामुळे बरेचसे प्रकार बंद झाले आहेत.

हो बरोबर आहे. पोस्ट डेटेड चेक नावाचा एक प्रकार होता. म्हणजे आज पैसे नसतील, तर पुढच्या तारखेचा चेक द्यायचा. समजा विशिष्ट तारखेचा चेक दिला असला की, उधारी फेडणारा त्यादिवशी बरोबर सकाळी फोन करायचा, थोडे दिवस थांब, आताच चेक टाकू नको, माझ्याकडे पैसे नाहीत. आता हाही प्रकार थांबला आहे. तू कुठूनही आण; पण आधी माझी उधारी परत कर आणि तेही यूपीआय स्कॅनवर आताच्या आता हा प्रकार सुरू झाला आहे. चिल्लर नाहीत, नंतर देतो, मी का कुठे पळून चाललो आहे का? एवढा विश्वास नाही का माझ्यावर? तुला तर माहिती आहे, माझ्याकडे पैसे आहेत; पण आता रेंज नाही, हे सर्व प्रकार बंद होऊन तत्काळ पैसे ट्रान्स्फर करण्याची सुविधा झाली आहे. हे मात्र नेहमी उधारी घेणार्‍या मित्रांवर घाव घातल्यासारखे झाले आहेत.

बरोबर आहे तुझे. उधारी असली की, प्रेम असायचे, जिव्हाळा असायचा. तो सगळा बंद झाला. त्यामुळे उधारी प्रकरणातील मजा निघून गेली आहे, हे नक्की! समजा एखाद्या मित्राने दुसर्‍या मित्राकडून पाच हजार रुपये उसने घेतले आहेत, तर ते पैसे परत येईपर्यंत त्या मित्राला उधार घेणार्‍या मित्राची दररोज आठवण येत असते. शिवाय हा पैसे परत करील की नाही, हा एक सस्पेन्स होता, थरार होता. तो संपल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञाने या उधारी प्रकरणातील सर्व रंजकता घालवून टाकली आहे. इथे यूपीआय करून पैसे ट्रान्स्फर करणेच भाग आहे. आधी एटीएम आले ते पण कधी चालते कधी नाही. त्यामुळे उधारी देणे टाळता येत होते. आता यूपीआयमुळे ती सोय अजिबात राहिली नाही. यूपीआयमुळे पैशांचा व्यवहार करणे अगदी सोपे झाले आहे. किती अंतरावर अगदी सहजपणे तुम्ही पैसे पाठवू शकतात. ही एक प्रकारची क्रांतीच म्हणावी लागेल. यूपीआयमुळे अडचणीतील व्यक्तीला मदत करण्याचा एक सरळ चांगला मार्ग मिळाला आहे; पण यूपीआयचे कारण सांगत मात्र एखाद्याला उसने पैसे देण्याचे वांदे झाले आहे, हे नक्की!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news