Chhatrapati Shivaji Maharaj | लंडनच्या संग्रहालयातील वाघनखं छत्रपती शिवरायांचीच : डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी

Chhatrapati Shivaji Maharaj | लंडनच्या संग्रहालयातील वाघनखं छत्रपती शिवरायांचीच : डॉ. प्रतापसिंह जाधव

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळी येथे 1659 साली अफजल खान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात आहेत. त्याची खातरजमा करण्यासाठी आपण स्वतः पाठवलेल्या पत्राला 1971 साली व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या वस्तुसंग्रहालयाकडून लेखी उत्तर देण्यात आले. त्यांनी सोबत दोन फोटो पाठवले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीसह ही वाघनखे इंडियन सेक्शनमध्ये फ्रेम 709, रूम नंबर 7 मध्ये असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. इतका स्पष्ट उल्लेख असताना परत त्या वाघनखांवर शंका उपस्थित करणे चुकीचे असल्याचे दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ‘पुढारी न्यूज’शी बोलताना सांगितले. 1971 पासून आपण याविषयी सतत पाठपुरावा करत असून, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचेही याकडे लक्ष वेधल्याचे सांगत डॉ. जाधव यांनी अभ्यासाशिवाय कोणीही या विषयावर बोलू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. (Chhatrapati Shivaji Maharaj)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला, तीच वाघनखे इंग्लंडच्या संग्रहालयात असल्याचा पुरावा आपल्याकडे आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, ही वाघनखे छत्रपती शिवरायांची आहेत याचा पुरेपूर पुरावा दै. ‘पुढारी’कडे आहे. आपण दै. ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. 1971 साली वि. ह. कोडोलीकर यांना आलेले पत्र, काशीराम रत्नसावंत तथा तात्यासाहेब देसाई यांनी ते पत्र आपल्याकडे दिले होते. त्यांनी इंग्लंड येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या वस्तुसंग्रहालयाशी बराचसा पत्रव्यवहार केला होता. त्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देत देसाई यांनी एक लेख लिहिला होता. तो लेखही दै. ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांनी दिलेले पत्रही प्रसिद्ध केले होते. त्या लेखामध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या वस्तुसंग्रहालयाचे 11 डिसेंबर 1931 चे पत्र आहे. हे स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्र असून या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीबद्दल उल्लेख करण्यात आला आहे.

शिवरायांनी वापरलेली तलवार असा उल्लेख

डॉ. जाधव म्हणाले, हे पत्र वाचल्यानंतर आपण स्वतः 1971 साली व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या वस्तुसंग्रहालयाला पत्र लिहिले. त्या पत्राला संग्रहालयाकडून उत्तर पाठवण्यात आले. त्या उत्तरासोबत दोन फोटोही पाठवण्यात आले. ही छत्रपती शिवरायांनी वापरलेली तलवार आहे, असा उल्लेख त्या पत्रात आहे. त्यांनी भवानी तलवार असा उल्लेख केला नाही. मात्र शिवरायांनी वापरलेली तलवार आहे, असा उल्लेख त्यामध्ये आहे. त्याचबरोबर त्यांनी त्या पत्रात स्पष्ट सांगितले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळी येथे 1659 साली अफजल खान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात इंडियन सेक्शनमध्ये फ—ेम 709 आणि रूम नंबर 7 मध्ये आहेत. इतका स्पष्ट उल्लेख असताना परत त्या वाघनखांवर शंका उपस्थित करणे चुकीचे आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंकडूनही प्रयत्न

1931 साली पहिले पत्र आले. त्यानंतर 1971 साली दुसरे पत्र मला आले. त्यावेळी तर हा वादच नव्हता. मी इतकेच करून थांबलो नाही. मी त्वरित त्याच्यावर अग्रलेख लिहिला. त्यावेळी मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. छत्रपती शिवरायांच्या वस्तू भारतात परत आणाव्यात, असे आवाहन आपण स्वतः मंत्रिमंडळाला केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडून हा सर्व पत्रव्यवहार मागून घेतला. त्यांनी लंडनशी पत्रव्यवहार केला आणि त्यावेळी शिवरायांची तलवार आणि वाघनखे आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र काही कारणास्तव त्यांना मंत्रिपद सोडावे लागल्याचे डॉ. जाधव म्हणाले.

राम गणेश गडकरी यांच्या कवितेची आठवण

डॉ. जाधव म्हणाले, महाराष्ट्राचे लाडके कवी राम गणेश गडकरी यांनी लोकमान्य टिळक इंग्लंडला जात होते, त्यावेळी कवितेच्या माध्यमातून त्यांना एकच विनंती केली होती. ती कविता अशी…‘न लगे दौलत, न लगे बरकत, नको कोहिनूर, स्वदेश न लगे, स्वराज्य न लगे, हो सर्वही चूर, एक सांगणे, एक मागणे, तेच लाखवार, मागून घ्यावी श्री शिवबाची भवानी तलवार…’ यावरून आपल्या लक्षात येईल की, आपल्या शिवरायांच्या बर्‍याच गोष्टी लंडनमधील संग्रहालयांमध्ये आहेत. आपण हे आणणार आहोत की नाही? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांवरून अजूनही वाद सुरू आहे. ते मुंबई येथे अरबी समुद्रामध्ये साकारायचे की, आणखी कोणते पर्यायी ठिकाण त्यासाठी निश्चित करावे याबद्दल स्पष्टता नाही.

कोणताही वाद-प्रतिवाद नको

“माझी राजकारण्यांना इतकीच विनंती आहे की, आपण कोणीही अभ्यास केल्याशिवाय कोणतेही वक्तव्य करू नका”, असे आवाहन करत डॉ. जाधव म्हणाले, “आपल्याला स्वतःला गोष्टी माहीत असल्याशिवाय वक्तव्ये टाळावीत. फक्त टीव्हीवर चेहरा दिसावा म्हणून तुम्ही कोणतीही विधाने, कोणताही वाद-प्रतिवाद करू नका, अशी आपल्याला माझी विनंती आहे.” (Chhatrapati Shivaji Maharaj)

शिवरायांनी वापरलेल्या वस्तू पुढील पिढ्यांना स्फूर्ती देतील

डॉ. जाधव म्हणाले, सुधीर मुनगंटीवर यांना आपण विनंती करतो की, इंग्लंड येथील सर्व वस्तुसंग्रहालये त्यांनी पाहावीत. त्यांच्याकडे आपल्या कोणकोणत्या वस्तू आहेत हे पाहावे आणि छत्रपती शिवरायांनी वापरलेल्या वस्तूंसह इतर सर्व ऐतिहासिक वस्तू भारतात आणून त्याचे येथे संग्रहालय करावे. त्या सर्व वस्तू पुढील पिढ्यांना स्फूर्ती देतील. ते स्फूर्तिस्थान आहे. त्यामुळे त्या वस्तू भारतात कायमस्वरूपी येणे गरजेचे आहे.

Back to top button