108 मंजूर तर 63 कार्यान्वित; आणखी 45 प्रस्ताव बारगळले | पुढारी

108 मंजूर तर 63 कार्यान्वित; आणखी 45 प्रस्ताव बारगळले

एकनाथ नाईक

कोल्हापूर : अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उच्च दर्जाचे उपचार आणि वैद्यकीय सेवा मिळावी, म्हणून राज्यातील सर्वच जिल्ह्यात ट्रामा केअर सेंटर उभारण्याचा निर्णय गतसाली राज्य सरकारने घेतला होता. 108 ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 63 सेंटर्स कार्यान्वित झाली आहेत. अजून 45 ट्रॉमा सेंटर विविध कारणांमुळे बारगळली आहेत.

ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा असतात. त्यामुळे अपघातग्रस्तांवर उपचार करणे अधिक सोयीचे होते. त्यामुळे येथे अपघाततील गंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते. येथे रुग्णांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी 24 तास उपलब्ध असतात. अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी, म्हणून शासनाने ट्रामा केअर सेंटरला मंजुरी दिली.

शासनाच्या आरोग्य विभागाने केवळ ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची घोषणा केली. पण, ते पूर्णत्वास जाणे तितकेच महत्त्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील 31 ट्रॉमा केअर सेंटरची कामे वेगवेगळ्या कारणांमुळे अपूर्ण आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे राज्यातील 45 ट्रॉम केअर सेंटर कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. जी सेंटर पूर्णत्वास आली आहेत. ती रुग्णसेवेत आणण्याची तितकीच गरज आहे. पण, याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष आहे. ही सेंटर सुरू झाली, तर ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे.

अपूर्ण ट्रॉमा केअर सेंटर

एक सेंटर अपूर्ण असणारे जिल्हे : नंदुरबार, ठाणे, रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग
दोन सेंटर अपूर्ण असणारे जिल्हे : नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे.
तीन सेंटर अपूर्ण असणारे जिल्हे : पालघर, सांगली
चार सेंटर अपूर्ण असणारे जिल्हे : सोलापूर, पुणे

Back to top button