कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : इंडिया आघाडीतील नेते स्टॅलिन यांनी केलेली हिंदू संस्कृती संपविण्याची भाषा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मान्य आहे का? असा खडा सवाल करून हिंमत असेल आणि खरे हिंदुत्ववादी असाल तर उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडी सोडावी, असे थेट आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर लोकसभा महाविजय 2024 मिशन अंतर्गत संपर्क आणि समर्थन अभियान रॅलीनंतर गुजरी कॉर्नर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून देशाचा विकास केला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळेच कोल्हापुरातील संपर्क व समर्थन अभियानात सर्वाधिक लोकांनी पंतप्रधानपदी मोदी यांना पसंती दिल्याचे बावनकुळे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 307 कलम रद्द करून काश्मिरात तिरंगा डौलाने फडकविण्याचे काम केले आहे. त्याच काश्मीरमध्ये पूर्वी वर्षभरात 18 लाख लोक जात नव्हते. आता एक कोटी 82 नागरिक जातात. हे केवळ पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच झाले. हिंदूंचे श्रद्धास्थान असणार्या अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याचे काम केले आहे. काँग्रेस नेते पूर्वी 'मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे' अशी भाजपवर टीका करीत होते. सध्या राम मंदिर उभारले असून जनतेसाठी मंदिर खुले करण्याची तारीखही जाहीर केली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी या मंदिराचे लोकार्पण होणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
भाजपने महिलांचा सन्मान केला. एका आदिवासी महिलेस राष्ट्रपती बनविले आहे. मुस्लिम महिलांचे संसार सुरक्षित करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. महिला आरक्षण कायदा केल्यामुळे भविष्यात 191 महिलांना खासदार होण्याची तर महाराष्ट्रात 100 महिलांना आमदार होण्याची संधी मिळेल, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून बारा बलुतेदारांना न्याय मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांना हरविण्यासाठी एकत्र आलेल्या 28 पक्षांनी कोल्हापुरात येऊन पंतप्रधान मोदी यांच्या जनतेतील लोकप्रियतेची माहिती घ्यावी. लोकसभेत दोन्ही खासदार पंतप्रधान मोदी यांच्यासाठी संसदेत पाठवून कोल्हापूरकरांनी विरोधकांना मतदानयंत्राद्वारे 400 व्होल्टचा शॉक द्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
कोल्हापुरात बावनकुळे यांच्या स्वागतासाठी जनतेचा महापूर आला होता. त्यांच्या दौर्यामुळे जिल्ह्यात चैतन्य आणि उत्साह निर्माण झाला. पंतप्रधान मोदी यांनी रोजगार व अन्न देऊन जनतेचे जीवन सुरक्षित करण्याचे काम केले आहे. 68 वर्षांत देशात जे घडले नाही ते पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षांत केले आहे. त्यामुळे देशात भाजपची लाट निर्माण झाल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, मुरलीधर मोहोळ, शौमिका महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, अशोक देसाई, संग्रामसिंह कुपेकर, कृष्णराज महाडिक, गायत्री राऊत, रूपाराणी निकम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश देसाई यांनी आभार मानले.
बावनकुळे यांनी महाद्वार रोडवरील नागरिक, व्यापारी, फळविक्रेते, फेरीवाले, व्यावसायिक यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रत्येकाने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच प्राधान्य दिल्याचे चित्र होते. सभेनंतर बावनकुळे यांनी श्री अंबाबाई मंदिरासह जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले.