भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा | पुढारी

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. बावनकुळे यांनी डॉ. जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी दै. ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा स्मितादेवी जाधव उपस्थित होत्या.

बावनकुळे जिल्हा दौर्‍यावर आले होते. शनिवारी रात्री त्यांनी डॉ. जाधव यांची नागाळा पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भाजपच्या वतीने सुरू असलेल्या ‘संपर्क ते समर्थन’ आणि ‘घर चलो’ अभियानाची त्यांनी डॉ. जाधव यांना माहिती दिली. यावेळी बावनकुळे यांच्या हस्ते ‘मोदी ऽ 20 – स्वप्ने होतील साकार’ हे पुस्तक डॉ. जाधव यांना देण्यात आले. देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर बावनकुळे यांनी डॉ. जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य आदी विविध क्षेत्रांसह सध्याचे राजकारण, भविष्यातील स्थिती आदींबाबत डॉ. जाधव यांची मते जाणून घेतली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले आपले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध संपूर्ण राज्याला माहीत आहेत, असे सांगत दै. ‘पुढारी’चे सामाजिक योगदान प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने डॉ. जाधव यांच्या हस्ते व डॉ. योगेश जाधव आणि डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, समरजित घाटगे, पुण्याचे माजी महापौर व भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, संग्रामसिंह कुपेकर आदी उपस्थित होते.

Back to top button