Kolhapur MLC Election : कोल्हापूर विधानपरिषदेचा आमदार ‘हे’ तालुके ठरवणार | पुढारी

Kolhapur MLC Election : कोल्हापूर विधानपरिषदेचा आमदार 'हे' तालुके ठरवणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक मंगळवारी जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचारासाठी केवळ एक महिना मिळणार असल्याने भेटीगाठींना वेग येणार असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. (Kolhapur MLC Election) हातकणंगले, शिरोळ, कागल  आणि पन्हाळा या तालुक्यातील मते निर्णायक ठरणार आहेत.

हातकणंगलेत आवाडे, कोरे गटाची भूमिका ठरणार निर्णायक

हातकणंगले : जिल्हा बँकेच्या सुरू असलेल्या घडामोडी, हुपरी, इचलकरंजीतील आ. प्रकाश आवाडे यांची, तर पन्हाळा, मलकापूर नगरपालिकेतील आ. विनय कोरे यांची सदस्यसंख्या विचारात घेता कोरे, आवाडे या दोघांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हातकणंगले तालुक्यातून विधान परिषदेसाठी इचलकरंजी नगरपालिकेत 61, वडगाव नगरपालिकेता 17, हुपरी नगरपरिषद 18, हातकणंगले नगर परिषदेत 17 आणि जिल्हा परिषद सदस्य 11 असे एकूण 125 मतदार आहेत.

भुदरगडमध्ये पाच मतदार

गारगोटी : विधान परिषद निवडणुकीसाठी भुदरगड तालुक्यात पाच मतदार आहेत. यामध्ये चार जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या एका सभापतींचा समावेश आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर गटाचे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी अबिटकर, सभापती आक्काताई प्रवीण नलवडे असे दोन मतदार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई यांच्या पत्नी, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा स्वरूपाराणी सत्यजित जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील विधान परिषदेचे मतदार आहेत.

Kolhapur MLC Election : कागलमध्ये 47 मतदार बजावणार हक्क

कागल : विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी नगरसेवकांची दिवाळी काहीअंशी यंदा गोड केली आहे. कागल तालुक्यात नगरपालिकांचे 41, जिल्हा परिषदेचे पाच व पंचायत समिती सभापती एक अशी मतदारांची संख्या आहे.

गगनबावडा तालुक्यात केवळ तीन मतदार

गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन सदस्य व पंचायत समिती सभापती असे एकूण तीन मतदार आहे. सभापतिपद काँग्रेसच्या सौ. संगीता पाटील भूषवित आहेत. जि. प. चे बजरंग पाटील व भगवान पाटील हे दोन मतदार आहेत.

आजर्‍यात अशोक चराटी यांच्या भूमिकेला महत्त्व

आजरा : विधान परिषदेचे बिगुल वाजले आहे. यंदा प्रथमच आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक मतदान करणार आहेत. त्यामुळे आजरा तालुक्यात नगरपंचायतमधील सत्ताधारी गटाचे नेते अशोक चराटी यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यात एकूण 22 मतदार आहेत. यामध्ये नगरपंचायतीत अशोक चराटी गटाचे दहा, तर महाविकास आघाडीकडे सहा व दोन अपक्ष नगरसेवक आहेत. जिल्हा परिषद सदस्यांत राष्ट्रवादी, काँग्रेस व ताराराणी आघाडीचे प्रत्येकी एक सदस्य आहे. पंचायत समिती सभापती राष्ट्रवादीचा आहे.

चंदगड : नगरसेवकांना पहिल्यांदा मिळणार मतदानाची संधी

चंदगड : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी चंदगड नगरपंचायतीच्या नगरसेवकांना पहिल्यांदाच मतदानाची संधी मिळणार आहे. या नगरपंचायतीत सध्या महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. 17 पैकी 11 नगरसेवक महाविकास आघाडीचे, तर 6 नगरसेवक भाजपाचे आहेत. जिल्हा परिषदेतील 4 जागांपैकी 3 सदस्य महाविकास आघाडीचे, तर एकमेव सदस्य भाजपचे आहेत. नुकत्याच झालेल्या गोकुळ संघाच्या निवडणुकीचा ‘टच’ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण गरम झाले आहे.

Kolhapur MLC Election : राधानगरीत सहा मतदार

कौलव : विधान परिषद निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात सहा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वच मतदार महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे आहेत. राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच सदस्य आहेत. त्यापैकी सौ. सविता भाटळे (राधानगरी) व विनय पाटील (राशिवडे)हे दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. पांडुरंग भांदिगरे(कसबा तारळे) व सविता चौगले(सरवडे) हे दोन सदस्य काँग्रेसचे आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या सभापती वंदना जाधव या शिवसेनेच्या आहेत.पंचायत समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीच्या सोनाली पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे सर्वच मतदार महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे आहेत.

पन्हाळा पालिकेचे अठरा मतदार

पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या 18 नगरसेवकांना मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे. पालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता असून आमदार विनय कोरे यांचे 13 नगरसेवक आहेत, तर पन्हाळा विकास आघाडीचे पाच नगरसेवक आहेत.एक स्वीकृत सदस्य मृत आहेत. त्यामुळे 18 सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

जनता दलाची साथ कोणाला?

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दलाची सत्ता असून 13 नगरसेवक जनता दलाचे व राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक आहेत. याशिवाय भाजपचे दोन, राष्ट्रवादीचे एक, तर ताराराणी आघाडीचे दोन जि. प. सदस्य, ताराराणी आघाडीतील पंचायत समितीच्या सभापती अशी 25 मतांची बेरीज आहे. यात सर्वाधिक मते जनता दलाची आहेत. त्यामुळे ते कोणाला मदत करणार, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे.

शाहूवाडीत 24 मतदार

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात एकूण 24 मतदार आहेत. मलकापूर नगरपालिकेचे 17 नगरसेवक, स्वीकृत सदस्य दोन असे 19 नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेचे चार सदस्य आणि पंचायत समिती सभापती असे पाच मतदार आहेत.

करवीरमध्ये बारा मतदार

कुडित्रे : करवीर तालुक्यातून बारा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे अकरा सदस्य व सभापती यांचा समावेश आहे. जि. प. सदस्यांत काँग्रेसचे 4, भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष 1 यांचा समावेश आहे.

शिरोळ तालुक्यात मतदारांचा टक्का वाढला

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, जिल्हा परिषद सदस्य, पं. स. सभापती यांची 71 मते आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी नव्याने स्थापन झालेल्या शिरोळ नगरपालिकेतील 18 नगरसेवकांची भर पडल्याने शिरोळ तालुक्यातील मतदारांचा टक्का वाढला आहे.

जयसिंगपूर व कुरूंदवाड पालिकेच्या कौन्सिलची डिसेंबरमध्ये मुदत संपत आहे. अशातच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने नगरसेवकांना चांगलाच भाव येणार आहे. जयसिंगपुरात 27, कुरूंदवाड 18, शिरोळ 18 नगरसेवक असे एकूण 63 मते, तर दानोळी, उदगाव, नांदणी, शिरोळ, आलास, अब्दुललाट, दत्तवाड असे 7 जिल्हा परिषद सदस्य व 1 पं. स. सभापती अशी एकूण 71 मते शिरोळ तालुक्यात आहेत.

Back to top button