पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे लक्ष

पालकमंत्री हसन मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीसाठी स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी सुळकूड योजना पूर्णत्वास जाणे महत्त्वाचे आहे. योजनेच्या विरोधात थेट भूमिका घेणारे मंत्री हसन मुश्रीफ यांची आता जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाली आहे. त्यामुळे योजना मार्गी लावण्याबाबत ते समन्वयाची भूमिका घेतात की निव्वळ कागल तालुक्याचीच बाजू घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

वाढती लोकसंख्या आणि त्यात मुबलक प्रमाणात न मिळणारे पाणी यामुळे शहरातील पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होत आहे. इचलकरंजीसाठी सुळकूड दूधगंगा योजना मंजूर झाली आहे. शहरासाठी राखीव पाणीसाठा असतानाही कोणत्याही संघर्षाच्या भाषेचा वापर न करता शहरवासीयांनी योजना पूर्णत्वास जाण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र तीही पुढे ढकलली.

योजनेसंदर्भात कागल तालुक्यातील नेत्यांनी थेट विरोध दर्शवला आहे. त्यातच मंत्री हसन मुश्रीफ, के. पी. पाटील आदींचा समावेश आहे. येथील लोकप्रतिनिधींकडून पुन्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे समन्वयाच्या बैठकीसाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यातच आता योजनेला थेट विरोध करणारे मंत्री मुश्रीफ पालकमंत्री झाले आहेत. मंत्री मुश्रीफ योजनेविषयी सकारात्मकता दाखवणार का, याबाबत चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याने इचलकरंजी शहराला भविष्यातील गरज ओळखून योजना पूर्ण करण्यास ते हातभार लावणार, याकडे लक्ष लागले आहे. राजकीय अडसर होऊ नये, यासाठी या प्रश्नाचे भिजत घोंगडे राहील, असा अंदाजही काहीजण व्यक्त करत आहेत.

सुळकूड योजनेशिवाय पर्याय नाही

इचलकरंजी शहरात कामगारांची संख्या अधिक आहे. दैनंदिन जगण्याची लढाई लढताना पाण्यासाठीही तोंड द्यावे लागत आहे. भविष्यातील स्वच्छ व मुबलक पाण्यासाठीही सुळकूडशिवाय अन्य कोणता पर्याय नाही. त्यामुळे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून मुश्रीफ यांनी समन्वय साधत मार्ग काढून इचलकरंजीकरांना पाणी द्यावे, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

पंचगंगा प्रदूषण प्रश्न मार्गी लागणार का?

इचलकरंजी शहराला पंचगंगा नळपाणी योजनेद्वारे 16 एमएलडीहून अधिक पाणी उपसा करून तो पुरवला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगेच्या प्रदूषणाचे भिजत घोंगडे कायम आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी 250 कोटींचा निधी देण्याची घोषणा शासनाने केली. पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागल्यास इचलकरंजीसह नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे हा प्रश्न पालकमंत्री मुश्रीफ कसा मार्गी लावतात, याकडे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news