CPR : कोल्हापूर : उपचार मोफत, औषधे मात्र विकत | पुढारी

CPR : कोल्हापूर : उपचार मोफत, औषधे मात्र विकत

कोल्हापूर, एकनाथ नाईक : सीपीआर गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड आहे. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांमुळे सीपीआरच्या लौकिकात भर पडली आहे. पण अलीकडे औषध कंपन्याची जीवघेणी स्पर्धा सीपीआरमध्ये घुसली आहे. येथे औषधांचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही बाहेरून औषधांसाठी घाट घातला जात आहे.

सीपीआरमध्ये दररोज सुमारे 1300 ते 1500 रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयांतील उपचार व औषधांच्या अवाढव्य खर्चामुळे रुग्णांचा शासकीय रुग्णालयांकडेच ओघ वाढला आहे. सीपीआरमध्ये रोज छोट्या-मोठ्या 150 शस्त्रक्रिया, 60 ते 65 सीटी स्कॅन, 30 ते 35 प्रसूती, 20 ते 25 डायलेसिस, 200 ते 250 एक्स-रे होतात. तसेच दीडशे ते दोनशे रुग्णांची नियमित रक्त, लघवी तपासणी केली जाते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉक्टरांनी अतितातडीच्या शस्त्रक्रियांना प्राधान्य दिले आहे. उर्वरित रुग्णांना पुढील तारखा देऊन शस्त्रक्रियेसाठी बोलावले जाते.

सीपीआर औषधांच्या बाबतीत अलर्ट आहे. मात्र, अनेकवेळा बाहेरून औषधे घेण्यासाठी डॉक्टर चिठ्ठी लिहून देतात. अमूक एका दुकानातून घ्या, या औषधांनी तुम्हाला बरे वाटेल, असे सांगितले जाते. रुग्ण किंवा नातेवाईकांनी औषधे येथे मिळत नाहीत का? असा प्रश्न केला तर बघा मिळतात का, असे सांगितले जाते. पण डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे सीपीआर औषध वितरण विभागात मिळत नाहीत; पण खासगी औषध दुकानात सहज उपलब्ध होतात. औषधांच्या खर्चामुळे रुग्णांसह नातेवाईक हतबल होत आहेत.

बाह्यरुग्ण विभागात एमआरची गर्दी

सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेला सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग दुपारी 1 पर्यंत सुरू असतो. त्यामुळे केसपेपर काढण्यासाठी येथे सकाळी सातपासूनच रुग्णांसह नातेवाईकांची रांग असते. केसपेपरनंतर रुग्णाला कोणत्या विभागात उपचारासाठी जायचे सांगितले जाते. येथे डॉक्टर आल्यानंतर रुग्ण तपासणीला सुरुवात होते. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या बरोबरीने विविध औषध कंपन्यांच्या एमआरचीही गर्दी असते. डॉक्टर रुग्ण तपासत त्यांच्याशी संवाद साधत असतात.

Back to top button